इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशच्या बारासागर क्षेत्रातील लालमन खेडे या गावात ४ मुलांचा विजेचा करंट लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही चारही मुले-मुली ८ वर्षाच्या आतील आणि एकाच कुटुंबातील होती. घराबाहेर ठेवलेल्या पंख्यामध्ये विजेचा करंट पसरल्याने ही घटना घडली. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली.
लालमन खेडे गावातील रहिवाशी विरेंद्र कुमार यांच्या घराबाहेर फर्राटा पंखा लावण्यात आला होता. जवळच खेळणाऱ्या एका मुलाने या पंख्याला हात लावला त्यानंतर त्यांना करंट बसला. विशेष म्हणज एकाला करंट लागल्यानंतर ३ मुलेही त्याच्या जवळ पोहोचली आणि त्यांनाही करंट लागला.
या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये मयंक (८), हिमांशी (८), हिमांक (६) आणि मानसी (४) अशी मृत मुलांची नावे आहेत. ही सर्व मुले भाऊ-बहिण होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी सुरु केली. लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे वीजेच्या करंटने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना याअगोदरही झाल्या आहे. पण, एकाच वेळी चार मुले दगावल्याची ही घटना दुर्दैवी आहे.
कर्नाटकमध्ये मोबाईलच्या चार्जरच्या करंटमुळे एका लहानग्याला काही महिन्यापूर्वी जीव गमवावा लागला होता. त्यानंतर ही लहान मुलांच्या मृत्यूची ही घटना घडली आहे.