इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सिरीज रसिकांच्या भेटीला येत आहेत. ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी ),राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ “गाला प्रीमियर्स” ची बहुप्रतिक्षित दुसरी आवृत्ती सादर करण्यासाठी उत्सुक आहे. महोत्सवाची मूलभूत तत्वे कायम राखत चित्रपटातील कलाकारांना प्रेक्षकांशी जोडण्यासाठी, जागतिक सिनेमॅटिक कलात्मकता साजरी करण्यासाठी आणि निवडक निखळ चित्रपट सादर करण्याच्या दृष्टीने या विभागाची काळजीपूर्वक आखणी केली आहे.
सलमान खान द्वारा निर्मित आणि नवोदित कलाकार असलेला फॅरे (हिंदी) , ए.आर. रहमानचे संगीत आणि अरविंद स्वामी, विजय सेतुपती आणि अदिती राव हैदरी या प्रमुख कलाकारांचा गांधी टॉक्स (मूक पट ) ,पंकज त्रिपाठी आणि पार्वती थिरुवोथू अभिनीत कडक सिंग (हिंदी), सिद्धार्थ रंधेरिया अभिनीत हरी ओम हरी (गुजराती), नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत रौतू की बेली (हिंदी), विजय राघवेंद्र अभिनीत ग्रे गेम्स (कन्नड) या चित्रपटांचे जागतिक प्रीमियर्स तसेच अमेझॉन ओरिजिनल्सच्या दोन सिरीज (तेलुगु) , नागा चैतन्य पार्वती थिरुवोथु प्रमुख कलाकार असलेली धुठा(तेलुगू) आणि आर्य अभिनीत द व्हिलेज (तमिळ), तसेच अक्षय ओबेरॉय आणि उर्वशी रौतेला अभिनीत दिल है ग्रे (हिंदी) आणि तरसेम सिंगचा डियर जस्सी (पंजाबी) या चित्रपटांचे आशिया प्रीमियर इफ्फी मध्ये होणार आहेत.
ए वतन मेरे वतन या चित्रपटानिमित्त करण जोहर आणि सारा अली खान यांच्यातील संभाषण खास आकर्षण असेल. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणले, ‘सलमान खान निर्मित ‘फॅरे’ ; झी ची निर्मिती असलेला अरविंद स्वामी आणि विजय सेतुपती यांचा ‘गांधी टॉक्स’; पंकज त्रिपाठीचा ‘कडक सिंग’; नागा चैतन्य आणि पार्वती थिरुवोथु अभिनित ‘धूठा ‘; आणि आर्य आणि दिव्या पिल्लई यांचा ‘द व्हिलेज’ या अमेझॉन ओरिजिनल सिरीज या चित्रपट आणि मालिकांच्या प्रतिष्ठित चित्रपट दिग्दर्शक आणि एआर रहमान आणि उर्वशी रौतेला यांच्यासह प्रतिभावान अभिनेत्यांचे मी हार्दिक स्वागत करतो . प्रख्यात तरसेम सिंगची उपस्थिती या चित्रपट महोत्सवाला नव्या उंचीवर नेईल. हे भव्य प्रिमीअर्स ‘मेरी माटी मेरा देश’ या नव्या संकल्पनेशी मेळ साधत उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेच्या मातीतील चित्रपट सादर करणार आहेत. आपण सर्वानी एकत्र गोव्यात सिनेमाची जादू साजरी करूया !” “जगभरातील चित्रपट कलेचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण इफ्फीमध्ये एकत्र जमत असल्याचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच महोत्सवाचे संचालक प्रितुल कुमार यांनी सांगितले. चित्रपट ही एक सार्वत्रिक भाषा असून ती सीमा आणि संस्कृतींच्या पुढे जाणारी आहे याची आम्हाला प्रत्येक वेळी आठवण करून दिली जाते, असेही ते म्हणाले. गाला प्रीमियर विभाग हा कथाकथनाच्या सामर्थ्याचा पुरावा असून प्रेक्षकांना प्रेरणा आणि चैतन्य देणारे मनमोहक चित्रपट सादर करण्याचा सन्मान आम्हाला मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. चला, रुपेरी पडद्याची जादू पसरवून कथाकथनाचा आनंद लुटण्यासाठी एकत्र येऊ या, असेही ते म्हणाले.
सौमेंद्र पाधी दिग्दर्शित “फॅरे” हा चित्रपट उलगडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या एका रोमांचक प्रवासाचे वचन देणारा, तर किशोर पाडुरंग बेलेकर लिखित “गांधी टॉक्स” चित्रपट हिंदू पौराणिक कथा आणि ‘समुद्र मंथन’ या कथेच्या संदर्भाने भांडवलशाही, वर्णद्वेष आणि समाजाच्या खोलीचा शोध घेणारा आणि सामाजिक भाष्य करतो. .’
अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित “कडक सिंग” हा चित्रपट आर्थिक गुन्हे विभागाचे अधिकारी ए.के. श्रीवास्तव यांच्या कथेचे वर्णन करतो या अधिकाऱ्यांला एका प्रकारचा स्मृतीभ्रंश झाल्याचे निदान झालेले आहे. अशी स्थिती असूनही, तो अधिकारी रुग्णालयात लोकांचेही वेगवेगळे दृष्टीकोन ऐकून चिटफंड घोटाळ्याचे गुंतागुंतीचे प्रकरण सोडवतो. मिलिंद राऊ दिग्दर्शित “द व्हिलेज” हा चित्रपट प्रेक्षकांना एका रस्ते प्रवासावर घेऊन जातो जो प्रवास एक कुटुंब विचित्र उत्परिवर्तांच्या हल्ल्यात बळी पडल्यानंतर अतिशय भयंकर ठरतो.
५४ व्या इफ्फी मधील गाला प्रीमियर्स विभाग “हरी ओम हरी,” “डियर जस्सी,” “रौतू की बेली,” “धूथा,” “दिल है ग्रे,” आणि “ग्रे गेम्स” यांसह इतर अनेक उल्लेखनीय चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना देणार आहे. हे वैविध्यपूर्ण आणि मनमोहक अनुभव देणारे चित्रपट मानवी धारणांना आव्हान देणारे, मानवी भावनांचा शोध घेत अनेक रहस्यांचा उलगडा करणारे आहेत.
५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) हा जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन करणारा सर्वात महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे. हा महोत्सव प्रस्थापित आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या उत्कृष्ट कलाकृती जागतिक प्रेक्षकांसोबत सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. विविध प्रकारचे चित्रपट आणि कार्यक्रमांच्या निवडीद्वारे इफ्फी चित्रपट कला साजरी करण्यासाठी आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. डायरेक्ट टू ओटीटी मालिका आणि प्रदर्शित न झालेले चित्रपट त्यांचा आशय महोत्सवातील प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी उत्सुक आहेत. हा आशय इतर कोणी पाहण्यापूर्वी आपण पाहण्याची नोंदणीकृत प्रेक्षकांची उत्सुकता इफ्फी पुन्हा एकदा या वेळी पूर्ण करणार आहे.