इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंब्रा येथील शाखेवरुन आता शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आमने सामने आले आहे. ही शाखा बुलडोझर लाऊन पाडल्यामुळे आज उध्दव ठाकरे येथे जात असतांना ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. या शाखेवरुन दोन्ही गटात अगोदरच चांगली जुंपली आहे. उध्दव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडण्यात आल्यामुळे येथील वातावतरणही तापले होते. पण, आज उध्दव ठाकरे गटाने या ठिकाणी शक्तीप्रदर्शन केले. तर दुसरीकडे शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी या दौ-यात सुरु केल्याचे दिसत आहे.
ठाकरे गटाच्या मुंब्रा शहरातील एक शाखेवर बुलडोझर चालवून ती शाखा पाडण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरे मुंब्र्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्र्यात अतिशय हालव्होल्टेज घडामोडी बघायला मिळत आहेत. जी शाखा पाडण्यात आली ती शाखा आपलीच होती, असा दावा शिंदे गटाचा आहे. तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्या शाखेवर दावा करत आहेत.
जितेंद्र आव्हाडांचा पोलिसांवर आरोप
सकाळी राष्ट्रवादीचे नेते जिंतेद्र आव्हाड यांनी ट्विट करत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हे होर्डिंग्ज शहरात लावलेले होते. यातील ९० टक्के होर्डिंग्ज आता फाडण्यात आले आहेत. मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत. एक होर्डिंग फाडायला किमान १५ मिनिट तरी लागतात.आणि “सर्वत्र नजर असणाऱ्या” पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही. आता पोलीस मला म्हणत आहेत की, उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!