नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यात १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सुत्रबद्ध नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठकीत दिल्या.
विकसित भारत संकल्प यात्रा निमित्ताने आज दुरष्यदृष्यप्रणालीद्वारे बैठकी संपन्न झाली, या प्रसंगी जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, लीड बँक मॅनेजर श्री.पाटील, जिल्हा सुचना केंद्राचे संजय गंजेवार आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हधिकारी जलज शर्मा म्हणाले की, जनजाती गौरव दिनाच्या दिवशी १५ नोव्हेंबर, रोजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ ते २२ नोव्हेंबर या कालवाधीत जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील १४ ग्रामपंयतींमध्ये या यात्रेचे आयोजन केले जाणार आहे. या यात्रेमार्फत ग्राम स्वराज्य अभियान राबविले जाणार असून अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून राबविण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करावे. या यात्रेसाठी शासनाकडून सुसज्ज अशा व्हॅन जिल्ह्यात येणार असून या व्हॅनमार्फत ६ तालुक्यात तसेच नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी केली जाणार आहे.
ही यात्रा पुढील टप्प्यात गावपातळी, सर्व ग्रामपंचायत क्षेत्र, नगरपालिका/नगरपरिषद, महानगरपालिकेच्या क्षेत्रात जाणार असल्याने या यात्रेचे दरदिवसाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावेत. या यात्रेत भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहचविणे व विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य ती कार्यवाही यंत्रणेने करावी. या यात्रेसाठी केंद्र शासनाच्या सुचनेनुसार मनुष्यबळ, वाहनव्यवस्था, यात्रेच्या जाण्या-येण्याची व्यवस्था, स्थळ इत्यादींची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी. यासाठी महानगरपिालका, नगरपालिका/नगरपरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर समन्वय समिती गठीत करण्याच्या व प्रत्येक कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठकीत दिल्या.
या यात्रेदरम्यान शासनाच्या विविध योजनांचे लाभाचे अर्ज लाभार्थ्यांकडून भरुन घ्यावेत. तसेच यासाठी प्रत्येक गावात ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. तसेच यात्रेची माहिती, फोटो, व्हिडीओ अपलोड करावेत. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, लाभार्थी, यांचा जनसहभाग घेऊन ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी दिल्यात.
बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी दुरदृष्यप्रमाणाली द्वारे उपस्थित होते.
विकसित भारत संकल्प यात्रेची ठळक वैशिष्टये
- विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतू आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यत पोहोचणे.
- योजनाचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरुकता निर्माण करणे.
-नागरिकांशी संवाद-वैयक्तिक कथा, अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे. - यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशिलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे.
- जनजाती गौरव दिनाच्या दिवशी 15 नोव्हेंबर 2023 रोजी या यात्रेचा शुभारंभ केला जाईल.
- सुरवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या 110 जिल्ह्यांना आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून 26 जानेवारी 2024 पर्यंत उर्वरित जिल्ह्यांन ही यात्रा भेट देईल.
- निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये, मतदारसंघात, आदर्श आचारसंहिता उठल्यानंतर विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित केली जाईल.
- विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक आखताना स्थानिक परिस्थिती उदा.हवामान, सण इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातील.
- या यात्रेचे समन्वय साधण्यासाठी केंद्र शासन स्तरावर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय ही ग्रामीण आणि लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांसाठी नोडल मंत्रालये राहणार असून शहरी भागांसाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गृहनिमाण आणि शहरी कार्य मंत्रालय ही नोडल मंत्रालये राहणार आहे.