इंडिया दर्पण विशेष विश्लेषण
भारताचा पाकिस्तानवर ‘विराट’ विजय
संपूर्ण भारतवासियांचे आज एका महत्त्वाच्या घटनेकडे लक्ष लागले होते. अखेर उत्कंठावर्धक सामन्यात विराट कोहलीच्या शानदार खेळामुळे भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. आजच्या सामन्याने अनेक बाबी अधोरेखित केल्या आहेत. खासकरुन विराट कोहलीची खेळी… यासंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे…..
विराट कोहलीचे अनंत चाहते जगभरात का आहेत? याचे उत्तर विराटने आज पाकिस्तान विरुद्ध झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आपल्या बॅटद्वारेच देऊन टाकले. एक मोठा बॅडपॅच, त्यापायी गमावलेले कर्णधारपद…परंतु त्यानंतर केलेले कमबॅक अजूनही चाहत्यांपर्यंत तितकेसे पोहोचलेले नाही असे वाटत असतानाच, विराटने या मॅचमध्ये कमाल केली. ‘बाप बाप असतो’ हे वाक्य सोदाहरण स्पष्ट करुन देतांना विराटने आज भारतीय संघातील फलंदाजांना आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांना पुस्तकातला एक नवा धडा शिकवला.
२० षटकात १६९ धावांचा मुकाबला करताना ज्या वेळेला विराट मैदानात उतरला त्यावेळेला खरेतर भारताची अवस्था चांगलीच वाईट होती. सलामीवीर के. एल. राहुल आणि रोहित शर्मा हे फारसे काहीही न करता आणि ज्याच्यावर भरोसा असतो तो सूर्यकुमार देखील लवकर अस्ताला गेलेला असतांना दुसऱ्या बाजुने आलेल्या अक्षर पटेलने देखील एकही अक्षर न लिहिता विराटची साथ सोडली. तेव्हा ४ बाद ३१ अशी भारतीय संघाची दयनीय अवस्था होती. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्या सोबत कोहलीने सूत्र हातात घेतली. त्यानंतर मग, एकट्या कोहलीने संघाचे सगळे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेऊन विजयाच्या पैल तीरावर संघ पेलून नेताना लाखो करोडो चाहत्यांची प्रंशसा गोळा केली आहे. विराट कोहलीचे असंख्य फॅन फॉलोवर्स आहेत. परंतु, या एकट्या डावानंतर त्यात आणखी भर पडणार आहे हे निश्चित
भारताच्या डावाची १० षटकं पूर्ण होईपर्यंत हा सामना भारताच्या हातातून पूर्णपणे निघून गेलेला होता. परंतु दहाव्या षटकानंतर एक प्रशिक्षकांसोबत एक छोटीशी टीम मीटिंग झाली आणि तिथून विराट कोहलीने आपल्या फलंदाजीचा गिअर बदलला. अवघ्या ५३ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकार अशा १५४.७२ च्या सरासरीने काढलेल्या नाबाद ८२ धावा या भारतीय संघासाठी दिवाळीचे एक मोठं गिफ्ट ठरल्या आहेत. या संपूर्ण डावात कोहलीने ‘लीडिंग फ्रॉम द फ्रंट’ यानुसार फलंदाजी केली. नाही म्हणायला हार्दिक पांड्याने केलेल्या ४० धावा या विजयात उपयुक्त ठरल्या आहे हे जरी खरे असले, तरी या विजयाच्या चित्रपटातील मुख्य भूमिका ही कोहलीनेच साकारली आहे. बाबरचे सगळे डावपेच कोहलीने अक्षरशः उधळवून लावले.
संकटात धैर्य खचून न देता थोडा धीर ठेवून जर कामगिरी केली तर संकटावर कशी मात करता येते हे आज कोहलीने दाखवून दिले. आवश्यक धावगती ही ११ च्या वर जात असताना देखील संयम दाखवायचा तिथे विराटने संयम दाखवला आणि जेव्हा वेळ आली तेव्हा गोलंदाजांना सीमापार फेकून देताना विराटने अजिबात हयागय केली नाही.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर भारतीय संघाला एक मोठा विजय मिळालेला असल्यामुळे या विश्वचषकात आता भारतीय संघाकडून नक्कीच नव्या आशाअपेक्षा बाळगल्या जातील. त्यात गैर असे काहीच नाही. परंतु भारतीय संघ हा मुख्यत्वे करून या स्पर्धेसाठी आपल्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियात पोहोचलाय, गोलंदाजीच्या नाही याची थोडीशी का होईना परंतु एक झलक या सामन्यात बघायला मिळाली. १४ व्या षटकापर्यंत पाकिस्तान ५ बाद ९८ या धावसंख्येवर खेळत होता परंतु २० षटक पूर्ण झाली तेव्हा ८ बाद १५९ इतक्या धावा पाकिस्तानच्या संघाने बनवल्या. डावातलं १७, १८ व १० वे षटक हे भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरते आहे ही गंभिर बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली. पाकिस्तान संघाविरुद्धचा विजय हा आपल्यासाठी कधीही एखाद्या विश्वचषक विजेतेपदापेक्षा कमी नसतो आणि तो साजरा ही तसाच झाला.
India Pakistan Cricket Match Analysis by Jagdish Deore