इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तणावाच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली आहे. या चकमकी संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज संसदेत यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, “माननीय सभापती/अध्यक्ष,
9 डिसेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये आपल्या सीमेवर घडलेल्या घटनेबद्दल मला या सन्माननीय सदनाला माहिती द्यायची आहे. 9 डिसेंबर 2022 रोजी, पीएलएच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत तेथील स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला.चीनच्या या प्रयत्नांचा आपल्या लष्कराने खंबीरपणे आणि दृढतेने सामना केला. त्यानंतर दोन्ही सैन्यांमध्ये समोरासमोर शारीरिक झटापट झाली मात्र भारतीय लष्कराने शौर्य दाखवत पीएलए ला आपल्या हद्दीत घुसखोरी करण्यापासून रोखले आणि त्यांना त्यांच्या चौक्यांवर परत जाण्यास भाग पाडले. या झटापटीत दोन्ही बाजूचे काही जवान जखमी झाले. मी या सदनाला सांगू इच्छितो की, आपल्या बाजूला जीवितहानी किंवा कोणताही जवान गंभीर जखमी झालेला नाही.
भारतीय लष्करी कमांडर्सनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पीएलएचे सैनिक आपल्या ठिकाणी परत गेले. या घटनेचा पाठपुरावा करत, 11 डिसेंबर 2022 रोजी या भागातील स्थानिक कमांडरने प्रस्थापित व्यवस्थेनुसार , त्यांच्या चिनी समकक्षांसोबत ध्वज बैठक घेतली आणि या घटनेसंदर्भात चर्चा केली. चीनला अशा कृती टाळण्यास तसेच सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखण्यास सांगण्यात आले. मुत्त्सदेगिरीच्या माध्यमातूनही हा मुद्दा चीनकडे उपस्थित करण्यात आला आहे.
मी या सदनाला आश्वस्त करू इच्छितो कि, आपले लष्कर आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि या विरोधातील कोणतेही प्रयत्न निष्फळ ठरवण्यासाठी सदैव तत्पर आहे. मला विश्वास आहे की, हे संपूर्ण सदन आपल्या जवानांच्या शौर्यपूर्ण प्रयत्नांमध्ये त्यांना एकमुखाने पाठबळ देण्यासाठी उभे राहील. जय हिंद !”
https://twitter.com/rajnathsingh/status/1602551886443270145?s=20&t=Snc2UmrzUJhcFKPWlNB4kg
मे-जून २०२० मध्ये वाद
विशेष म्हणजे १ मे २०२० रोजी पूर्व लडाखमधील पॅंगॉन्ग त्सो सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन्ही बाजूचे अनेक सैनिक जखमी झाले. येथून तणावाचे वातावरण वाढले. यानंतर १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले.
चिनी सैनिक घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जवानांनी त्यांना रोखल्यावर त्यांनी हिंसाचार केला. यानंतर वाद अधिकच वाढला. या चकमकीत दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगड आणि रॉड फेकण्यात आले. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले, तर ३८ हून अधिक चिनी सैनिक मारले गेले. अनेक चिनी सैनिक नदीत वाहून गेले. मात्र, चीनने केवळ चार सैनिकांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या दुसर्या अहवालानुसार या चकमकीत ४५ हून अधिक चिनी सैनिक मारले गेले.
चर्चेच्या अनेक फेऱ्या
१५ जून २०२० रोजी लष्करादरम्यान हिंसक चकमक झाल्यापासून सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही.
तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. यानंतर, फेब्रुवारी २०२१ मध्ये विभक्त होण्याची प्रक्रिया सुरू झाली. लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील चर्चेनंतर, दोन्ही बाजूंनी पॅंगॉन्ग लेक आणि गोगरा क्षेत्राच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरील सैन्य पूर्णपणे काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण केली. तथापि, एका अहवालानुसार, सध्या दोन्ही देशांचे ५० ते ६० हजार सैनिक एलएसी (वास्तविक नियंत्रण रेषा) च्या संवेदनशील क्षेत्रात तैनात आहेत.
१९६२ पासून वाद
भारत आणि चीनमध्ये सुमारे ३४४० किमीची सीमा आहे. १९६२ च्या युद्धापासून त्याचे बहुतेक भाग विवादित आहेत. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही देशांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी, शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी तोडगा काढण्याचे मान्य केले आहे. वादग्रस्त भागात यथास्थिती कायम ठेवण्याबाबत आणि लष्कराला हटवण्याबाबतही करार करण्यात आला आहे.
India China Troops Clashes in Tawang Sector Defence Minister Parliament
Arunachal Pradesh Border LAC PLA