पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेध यातून करण्यात येत आहे. या बंदमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा सहभाग असणार आहे. थोड्याच वेळापूर्वी विविध संस्था संघटना आणि राजकीय पक्षांच्या भव्य मोर्चाला प्रारंभ झाला आहे. शेकडो जण या मोर्चात सहभागी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील आणि इतरांनी महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे राज्यभरात वाद पेटला आहे. त्याच्याच निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे सहभागी होणार आहेत. या बंदला पुण्यातील सर्व व्यापारी संघटना, वाहतूक संघटना, गणेशोत्सव मंडळांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत पुण्यातील सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत.
मोर्चातून निषेध
या बंदच्या निमित्ताने मोर्चा काढण्यात येणार असून, डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन दहा वाजता मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा अलका चौकात पोहोचेल. तिथून पुढे लक्ष्मी रस्त्यावरुन हा मोर्चा बेलबाग चौकात पोहोचेल. तिथून हा मोर्चा लाल महालात पोहोचेल. लाल महालात या मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. दरम्यान, या बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे.
पुण्यात राज्यपालांच्या विरोधात काढलेल्या मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद.#पुणेबंद #punebandh #Pune#जय_शिवराय pic.twitter.com/IHBEiwSdpE
— Sambhaji Patil (@psambhajisakal) December 13, 2022
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मोर्चासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. गृहरक्षक दलाचे जवान, शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, यांच्यासह स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखेची पथकांचा बंदोबस्त या मोर्च्याच्या वेळी असणार आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं देखील या मोर्च्यावर लक्ष ठेवणार आहे. तसेच कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहालपर्यंत हा मूकमोर्चा जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरदेखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी सुमारे १०० वरिष्ठ अधिकारी, १०००हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
हे सर्व बंद राहणार
– मार्केट यार्ड बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि फुलांचे मार्केट बंद राहणार आहे.
– विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्याने लक्ष्मी रस्त्यासह शहरातील सर्व दुकाने तीन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
– गणेशोत्सव मंडळांनी पाठिंबा दिल्याने प्रमुख गणेश मंदिरे बंद असतील.
– शाळांना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र जबरदस्ती करण्यात येणार नाही.
– पी एम पी एम एल ही सार्वजनिक वाहतूक बस सेवा बंद राहणार आहे.
– रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिल्याने रिक्षा बंद राहणार आहेत.
– हॉटेल्सदेखील बंद राहणार आहेत
Pune Bandh Governor Koshyari Political Parties