नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यातील चित्त्यांचा मृत्यू सध्या जगभरातील वन्यजीव तज्ज्ञांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. १९८१ मध्ये स्थापन झालेल्या या राष्ट्रीय अभयारण्याची एवढ्या वाईट कारणांसाठी जगभर चर्चा होईल, याचा कुणी विचारही केला नव्हता. आतापर्यंत या अभयारण्यातील ८ चित्त्यांचा मृत्यू झालेला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि नाम्बियातील तज्ज्ञांनी यासंदर्भातील अभ्यास केला असून काही निरीक्षणे मांडली आहेत. त्यात प्रशासनाच्या व्यवस्थापन कौशल्यावर देखील बोट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील सर्वांत महत्त्वाचा व लक्षवेधक मुद्दा म्हणजे चित्त्यांच्या नैसर्गिक शिकारीचा आहे. या अभयारण्यातील चित्त्यांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी ज्या प्राण्यांची शिकार करायची असते अशा प्राण्यांच्या संख्येत कुनो जंगलात कमालीची घट झाली आहे. अशात त्यांना व्यवस्थापनाकडून तयार खाद्या दिले जात आहे. हे तयार खाद्य चित्त्यांसाठी फास्ट फूडप्रमाणे आहे. त्याचा विपरित परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असल्याने मृत्यूच्या दाढेत चित्त्यांना ढकलले जात आहे.
आठपैकी काही मृत्यू व्यवस्थापनाला नक्कीच रोखता आले असते, असेही या तज्ज्ञांनी आपल्या निरीक्षणात म्हटले आहे. गोपनीयता, नैपुण्याचा अभाव आणि गैरव्यवस्थापन ही सर्वांत मोठी अडचण असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. त्यामुळे एकूणच यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अयोग्य देखरेखीच्या कारणाने रेडिओ कॉलरमुळे झालेले संसर्ग लक्षातच न येणे, जंगलात सोडलेल्या चित्यांना नियमांविरुद्ध, नियमितपणे तयार खाद्य देणे आणि चित्त्यांचे भक्ष्य असलेल्या कुनोतील प्राण्यांच्या संख्येत झालेली घट, अशा त्रुटींमुळे चित्ता प्रकल्पावर प्रश्नचिन्ह लागले असल्याचे एका माध्यम समूहाने प्रकाशित केलेल्या बातमीत म्हटले आहे.
कर्मचारीच दोषी
भारतात येऊन पोहचल्यानंतर काही दिवस अलगीकरणात ठेवल्यानंतर चित्त्यांना मोठय़ा बंदिस्त आवारात सोडले जाते. चित्त्याने नियमितपणे शिकार करणे सुरू केल्यानंतर त्याला जंगलात मोकळे सोडण्यात येते. मात्र जंगलात सोडल्यानंतरही प्रकल्पाचे कर्मचारी त्यांना तयार खाद्य देत होते, अशी माहिती पुढे आली आहे.
India Cheetah Death South Africa Namibia Wildlife Experts