सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयकर विभागाच्या छाप्यात तब्बल ५० कोरी रुपयांचे बोगस व्यवहार उघडकीस आले आहे. गेल्या चार दिवसांत आयकर विभागाने विविध ठिकाणी छापे मारले आणि ही कारवाई केली. सोलापूर येथील एका कंपनीसह भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने छापे मारले.
सोलापूर येथील मुळेगाव रोडवर असलेल्या सोनांकूर एक्सोर्ट या कंपनीसह आसरा चौक, कुमठा नाका, हैदराबाद रोडवरील बांधकाम साहित्य विक्रेते व इतरांवर आयकर विभागाने छापे मारून ही कारवाई केली आहे. यात ५० कोटी रुपयांचे बोगस व्यवहार उघडकीस आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. सोनांकूर एक्सोर्ट ही कंपनी कत्तलखाना चालविते. या कंपनीची राज्यभर कार्यालये आहेत. मुंबईसह कोल्हापूर व इतर शहरांमध्ये छापे मारूनही आयकर विभागाने कागदपत्रे ताब्यात घेतली. यातून बेनामी व्यवहारांचा शोध सुरू असल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे.
रुग्णालयांवर छापे
आयकर विभागाने दोन महिन्यांपूर्वी सोलापूरमधील रुग्णालयांवर छापे मारले होते. त्यात दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता सलग चार दिवस बीफ विक्रेते, भंगार विक्रेते, बांधकाम साहित्य विक्रेत्यांवर छापे मारून आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे.
व्यवहारात तफावत
आयकर विभागाच्या कारवाईत भंगार विक्रेते व बांधकाम साहित्य विक्रीत मोठे व्यवहार रोखीने करण्यात आले. रोख व्यवहार आणि कागदोपत्री व्यवहार यात जवळपास ५० कोटी रुपयांची तफावत आढळून आली. आता या साऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत आयकर विभागाने दिले आहेत.
कच्च्या नोंदी
आयकर विभागाने या व्यवहारातील कच्च्या नोंदी असलेली कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. भंगार विक्रेत्यांनी खरेदी दर कमी दाखविले आहे. यात मोठी कर चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. आता कधीपासून हा प्रकार सुरू आहे आणि कोण लोक यात सामील आहेत, याचा तपास सुरू झाला आहे.
Income Tax Raid Solapur Businessman 50 Crore Fraud Money