कन्नौज, उत्तर प्रदेश (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – एस. मोहम्मद अय्यूब अँड मोहम्मद याकूब परफ्युमर्स. अत्तराच्या व्यापाराशी संबंधित ही कारखाना सुगंधी जगातील एक ब्रँड आहे. दोन शतकांपेक्षाही जुन्या कारखान्यात तयार होणार्या अत्तराच्या सुगंधाचा दरवळ जगाच्या अनेक देशांपर्यंत पसरला आहे. आखाती देशांमध्ये या कंपनीतील अत्तराची मागणी सर्वाधिक आहे.
इतके सगळे असतानाही हा कारखाना चिंचोळ्या गल्ल्यांमधील एका घरात सुरू आहे. त्यामध्ये एक पूर्ण मोहल्ला वसलेला आहे. तपास करणार्या पथकांच्या माहितीनुसार या कंपनीच्या आत एक शहरच वसलेले आहे. यामध्ये वेगवेगळे ५० हून अधिक जास्त घरे एकमेकांशी जोडलेले आहेत. गल्लीतून एक रस्ता जातो. एकदा घरात गेल्यानंतर बाहेर येण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतात. घरात एक लिफ्ट आहे. तपास करणार्या पथकातील अधिकारी या घरात गेल्यानंतर चक्रावलेच. रहिवासी परिसरापासून ते अत्तर बनविण्याचा कारखाना हे सर्व त्यातच होते.
शहराच्या मध्यभागी कारखाना
कन्नौज शहराच्या मधोमध मंडई आणि पंसारियान मोहल्ल्याच्या मधील भागात हा कारखाना वसलेला आहे. मलिक मियाँ यांचा कारखाना एस मोहम्मद अय्यूब अँड मोहम्मद याकूब परफ्युमर्स. या कारखान्याची नोंदणी १२५ वर्षांपूर्वी म्हणजेच १८९६ मध्ये झाले होते. येथे अत्तर बनविण्याचे काम त्यापूर्वीपासूनच सुरू आहे. येथील अत्तराच्या व्यवसायाला २०० वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास आहे, असे कारखान्याच्या संबंधित नागरिक सांगतात. मलिक मियाँ यांच्या पणजोबांनी या व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यानंतरची पिढी याच कामात जोडली गेली. या व्यवसायाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर १८९६ मध्ये त्याची नोंदणी करण्यात आली. त्याला एस मोहम्मद अय्यूब अँड मोहम्मद याकूब परफ्युमर्स असे नाव देण्यात आले.
एका शतकाहून जुने घर
कारखान्याच्या नोंदणीच्या दरम्यान घर बांधण्यात आले आहे. त्याच घरात अत्तर बनविण्याचे काम सुरू असते. नंतर घराचे क्षेत्र वाढत गेले. इमारती उंच होत गेल्या. परंतु काम तेथूनच सुरू राहिले. आता तर हा व्यवसाय पाहणार्यांनी आपले क्षेत्र परदेशापर्यंत वाढविले आहे. कौटुंबिक हिश्शांची विभागणी झाल्यानंतर अनेकांनी आपापला कारखाना स्थापन केला आहे.