मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अव्वाच्या सव्वा किमतीत मोठमोठ्या ब्रांडेड वस्तू खरेदी करणाऱ्यांवर, ऐपत नसताना विदेश दौरे करणाऱ्यांवर आणि आपल्या क्षमतेपेक्षा जास्त पैसे खर्च करून शाही सोहळे साजरे करणाऱ्यांवर आयकर विभागाचे लक्ष आहे. अशांना जेवढा पैसा उडवला तेवढाच भरावा लागण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
वाममार्गाने पैसा कमावून लोक वरच्या वर खर्च करतात. पण दोन लाखांच्या वर रोखीने खर्च करणाऱ्यांवर यंदा आयकर विभागाने विशेष लक्ष ठेवले आहे. अतिशय लक्झरी अशा उत्पादनांची खरेदी करायला हरकत नाही, पण त्याची किंमत तुमच्या उत्पन्नाशी मेळ खात नसेल तर आयकर विभागाचा मोर्चा तुमच्या दिशेने वळलाच म्हणून समजा. जास्तीचा खर्च केल्यानंतर आयकर विभागाच्या रडारवर येण्याची शक्यता असते. त्यामुळे लोक मित्रांचे किंवा नातेवाईकांचे पॅन कार्ड देऊन खर्च विभागून घेण्याचा प्रयत्न करतात. पण हा प्रकारही फार काळ आयकर विभागापासून लपून राहिला नाही. त्यांच्या आता हा प्रकार लक्षात आला असून अशाप्रकारचा प्रयत्न कुणी केला तर त्याचीही चौकशी होणार आहे. त्यासंदर्भातील निर्णय आयतकर विभागाने आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. महागड्या वस्तू खरेदी करताना दुकानदार पॅन कार्ड मागतात. एवढेच नव्हे तर मंगल कार्यालयात ५ लाखांच्या वर खर्च होत असेल तर तिथेही तुमचे पॅन कार्ड मागितले जाते. त्यामुळे तुम्ही केलेला खर्च तसाही आयकर विभागाकडे नोंदविला जातो.
उत्पन्न वाढविण्याची मोहीम
केंद्र सरकारने आयकराच्या माध्यमातून कराचे उत्पन्न वाढविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे लोकांच्या मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. दोन लाखांच्या वर रोखीने व्यवहार करणाऱ्यांना रिटर्न्स भरताना एसएफटी-०१३ हा फॉर्म भरणे बंधनकारक असेल. तसे केले नाही तर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Income Tax Department Royal Functions Tourism Expenses