मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करणे हे रुग्णालयांचे कर्तव्य असते, मग खासगी असो की सरकारी या रुग्णालयांमध्ये विविध प्रकारच्या रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत, असे शासनाचे आदेश असतानाही काही खासगी रुग्णालये रुग्णांच्या उपचारांमध्ये तर टाळाटाळ करतात. त्याचप्रमाणे वैद्यकीय शुल्क वसुली यामध्ये देखील गैरप्रकार करत असल्याचे उघड झाले आहेत.
इतकेच नव्हे तर कर चुकविण्यासाठी राज्यातील काही रुग्णालय वेगवेगळ्या प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब करीत असल्याचेही निर्दशणास आले आहे, त्यामुळे आयकर विभागाकडून अशा रुग्णालयांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक शहरांमधील रुग्णालयांतून रोखीने व्यवहार होत असल्याची माहिती आयकर विभागाला प्राप्त झाली आहे. आता विभागाने या रुग्णालयांचे व्यवहार तपासण्याचे नियोजन केले आहे. रोखीने व्यवहार करताना संबंधित रुग्णाचा किंवा पैसे भरणाऱ्याचा पॅन क्रमांक नोंदविला जात नसल्याचीही माहिती विभागाला मिळाली असून, त्या अनुषंगानेच कर चुकवेगिरीच्या मुद्द्यावर आता विभागाने कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत राज्यातील द्वितीय, तृतीय श्रेणी शहरे, नागरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोखीने व्यवहार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर विभागाने तेथे छापेमारी करत कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केली. या रकमेची कोणतीही व्यावहारिक नोंद या छाप्यादरम्यान विभागाला सापडली नाही. रोखीने झालेल्या या व्यवहारांमुळे कर चुकवला गेला असून, महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळेच आता या शहरांतील अन्य घटकांकडे विभागाने आपला मोर्चा वळवला आहे. त्याचप्रमाणे
नागरी भागात अनेक ठिकाणी पार्टी हॉल, पार्टी लॉन्स आहेत. इथे होणाऱ्या समारंभांसाठी होणारे व्यवहारही रोखीने होत असल्याची माहिती विभागाकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. याखेरीज, वास्तूविशारद, डॉक्टर, वकील यांचेही व्यवहार तपासण्याची तयारी विभागाने सुरू केली आहे. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर अशा प्रमुख शहरांमध्ये विभागाची कार्यालये आहेत. जिल्हानिहाय देखील विभागाची कार्यालये आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रत्येक शहरातील व्यवहार तपासणे शक्य होत नाही.
लहान शहरांतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या बेहिशोबी रकमेमुळे आता तिथे लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचे विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच रोखीने व्यवहार होतात, तिथे संबंधितांचा पॅन क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. मात्र, रुग्ण आपत्कालीन प्रसंगात येतात, उपचाराला प्राधान्य द्यावे लागल्याने पॅनकार्ड नोंदविणे शक्य होतेच असे नाही, असे रुग्णालयांचे सांगतात. परंतु रुग्णालयातील गैरप्रकार होतच असतात, हेही तितकेच खरे आहे, असे म्हटले जाते.
Income Tax Department Enquiry Transactions Cash
Pan Card Tax