नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन महात्म्य
पंडित दिनेश पंत
आज नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा, रक्षाबंधन अशा नावाने आता सण ओळखला जातो. उत्तर भारतात याला कजरी पौर्णिमाही म्हणतात. आजच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात. त्याचप्रमाणे बंदरामध्ये बोटींची पूजा करून मासेमारीला सुरुवात करतात. समुद्रामुळेच मासे मिळतात. तसेच, मासेमारीचा काळ हा सुखरुप पार पडावा तसेच समुद्र ही देवता असून तिच्यामुळेच मासेमार सुरक्षित राहतात, या भावनेने समुद्राची पुजा केली जाते. याचाच एक भाग म्हणून समुद्राला नारळ अर्पण केले जाते.
रक्षाबंधनाबाबत एक अख्यायिका सांगितली जाते. ती म्हणजे, भगवान श्रीकृष्ण यांनी शिशुपालाचा वध केला. त्यावेळी सुदर्शन चक्रामुळे त्यांच्या बोटाला जखम झाली. त्यातून रक्त वाहत होते. त्यावर द्रौपदीने स्वतःच्या भरजरी शालू फाडला आणि त्याच्या चिंधींने ती जखम बांधली. त्यामुळे रक्त वाहण्याचे थांबले. द्रौपदीने श्रीकृष्णाला आपला भाऊ मानले होते. त्यामुळेच कृष्णाने द्रौपदीचे कौरव सभेत भाऊ म्हणून रक्षण केले होते. अशी राखी पौर्णिमेची पौराणिक कथा सांगितली जाते.. आजच्या दिवशी बहिण भावाला राखी रुपी पवित्र बंधन बांधते. तर त्याच्या कपाळावर कुमकुम, अक्षतायुक्त तिलक लावते. याद्वारे ती भावाच्या दीर्घायुष्याची कामना करते. भाऊ देखील बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. आजच्या दिवशी घरोघरी नारळी भात करण्याची प्रथा आहे.