दीप अमावस्या
आज (८ ऑगस्ट, रविवार) सर्वत्र दीप अमावस्या साजरी होणार आहे. दीम अमावस्या म्हणजे नेमके काय, त्याचे महात्म्य का आहे हे सांगत आहेत पंडित दिनेश पंत…
दीप अमावस्या म्हणजे दिव्याची आवस. तिला आषाढ अमावस्या किंवा गतहारी अमावस्या (गटारी नव्हे) असेही म्हटले जाते. हिंदू संस्कृतीतील सर्व सण हे कृषीप्रधान निसर्ग महात्म्य सांगणारे आहेत. त्याचप्रमाणे निसर्गातील प्रत्येक घटकांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करणे आहेत. त्यासाठीच ते साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दीप अमावस्या अर्थात गतहारी अमावस्या होय.
चातुर्मास हा संपूर्ण पावसाळाभर असतो. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे जड अन्नपदार्थ पचण्यास अवघड असतात. त्यामुळे श्रावणाआधीचा आहार म्हणजेच जड आहार. म्हणजेच गतआहार. हा आहार या अमावस्येपासून बंद करून हलका आहार घ्यावा असा शास्त्रार्थ आहे. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यापासून सुरु होणाऱ्या सर्वच सणवारात दीप प्रज्वलन महत्त्वाचे असते. त्यामुळे या दिवसाला दीप अमावस्या असे म्हटले जाते. यादिवशी घरातील सर्व ठेवणीतले दिवे, समई, निरांजन हे घासून पुसून स्वच्छ करावे. त्यासोबत कणिक दिवे बनवून सायंकाळच्या वेळी पाटावर मांडावे. त्यानंतर हे सर्व दिवे प्रज्वलित करावेत. दिव्यांभोवती फुलांची रांगोळी काढावी. दिव्यांची मनोभावे पूजा करावी. दिव्याची कहाणी ऐकून दिव्याची आरती करावी. या दिव्याप्रमाणेच आपल्या आयुष्यातील चेतना आणि स्फूर्ती प्रज्ज्वलित रहावी अशी कामना करावी. गोडधोडाचा नैवेद्य दाखवावा.