इगतपुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेऊन इगतपुरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इगतपुरी जवळ ग्रँड परिवार हॉटेल समोर १ कोटी २८ लाख किमतीच्या १७८ गोण्या गुटखा जप्त केला आहे. यासह लाखो रुपये किमतीची २ वाहने सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहेत.
याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. ही धडक कारवाई इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी स्वतः आपल्या पोलीस पथकामार्फत केली. वाहनचालक सलमान अमीन खान (वय ३२), इरफान अमीन खान (वय ३१ रा. हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे.
इगतपुरी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून दोन मोठे वाहन पकडून झाडाझडती घेतली. त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. SHK Premium आणि 4K (STAR) ह्या गुटख्याच्या एकूण १७८ गोण्या जप्त करण्यात आल्या. १ कोटी २८ लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहितेचे विविध कलम आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, ढोकरे, सचिन देसले, मुकेश महिरे, खराटे, संवत्सर, अहिरे, रुद्रे, पोटींदे, बागुल आदींनी ही मोलाची कामगिरी केली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी या कामगिरीबद्धल सर्वांचे अभिनंदन केले आहे.
Igatpuri Police Raid Gutkha Seized