इगतपुरी – तालुक्यातील वासाळी ग्रामपंचायत सरपंच काशिनाथ कोरडे व ग्रामसेवक निलेश चव्हाण यांनी गेल्या चार वर्षांपासून केलेल्या अपहार प्रकरणी वासाळी ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींवर दोनदा चौकशी होऊन गटविकास अधिकारी यांनी अहवालात अपहार केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेला सादर केलेल्या अहवालावर अखेर ग्रामसेवक निलेश चव्हाण यांचे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी निलंबन केले तर सरपंच काशिनाथ कोरडे यांच्यावर कलम ३९ अन्वये कारवाई साठी प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवल्याचे समजते
२०१७- १८ पासून सरपंच काशिनाथ कोरडे व ग्रामसेवक निलेश चव्हाण यांनी मनमानी पध्दतीने ग्रामस्थांना कोणत्याही विश्वासात न घेता कामकाज केले होते. गेल्या चार वर्षांत एकही कामाचे टेंडर नाही ,अंदाजपत्रक तसेच मूल्यांकन नाही त्याच प्रमाणे कामे न करताच मोठया रकमांचे धनादेश काढून अपहार करणे , रेखांकित धनादेश देण्याऐवजी बेअरर धनादेश द्वारे व्यवहार करणे ,अनेक कामे न करताच निधी काढून घेणे ज्यात प्रामुख्याने वृक्षारोपण ,सॅनट्री पॅड ,शाळा वर्ग खोली दुरुस्ती ,पाणी पुरवठा अनुषंघिक कामे,गटार ,रस्ते यांचा समावेश आहे ,त्याच प्रमाणे अनेक कामे ही एनजीओ व कंपनी सीएसआर यातून केलेली असतांना ग्रामपंचायत ने केल्याचे दाखवून त्यात दुरुक्ती करून निधी अपहार केल्याचे दिसून आले होते
लोकवर्गणीतून घेतलेल्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनावर सुध्दा आदिवासी विकास विभागाकडून निधी घेऊन ग्रामस्थांना कोणतीही कल्पना न देता परस्पर निधी काढून घेणे ,पेसा व वित्त आयोग मंजूर आराखड्यात नसणाऱ्या बाबीवर मुख्यकार्यकारी अधिकारी यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोघम पद्धतीने कामे करणे या बाबी अहवालात स्पष्ट झाल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून ग्रामस्थांनी हा लढा लोकशाही मार्गाने सुरू केला होता त्यास यश आले आहे
घरचे पैसे असल्यासारखे खर्च केले
महाराष्ट्र राज्यातील ही एकमेव ग्रामपंचायत असेल ज्यात कोणत्याही कामाचे टेंडर ,अंदाजपत्रक ,मूल्यांकन न करता बेअरर धनादेशद्वारे निधी काढून घरचे पैसे असल्यासारखे खर्च केले आहेत ,सरपंच काशिनाथ कोरडे यांनी गाव आदर्श तर केला नाहीच पण भ्रष्टाचार करून गावचे नाव खराब केले ,जोपर्यंत अपहार केलेला निधी वसूल होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील
दौलत कोरडे, तक्रारदार
..
पूर्णपणे कारवाई होत नाही तोपर्यंत लढतच राहू
भूलथापा मारून आमच्या आदिवासी बांधवांना आदर्श गाव निर्माणचे खोटी स्वप्न दाखवून सरपंच झालेल्या काशिनाथ कोरडे यांनी आमच्या ग्रामस्थांचा विश्वासात केला आहे ,गावासाठी शासनाकडून आलेल्या निधीत मोठा अपहार करून गावाला विकासापासून वंचित ठेवले आहे ,कंपनी सीएसआर ,एनजीओ तसेच राज्य व केंद्र शासनाकडून राबविलेल्या योजना ग्रामपंचायत ने केल्याचे दाखवून केलेला अपहार उघडकीस आला आहे ,पूर्णपणे कारवाई होत नाही तोपर्यंत लढतच राहू
पांडुरंग कोरडे, सेवानिवृत्त तहसीलदार