नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंबेवाडी ता. इगतपुरी येथील निर्जनस्थळी जळालेल्या अवस्थेत मिळालेली कार नन्हावे ता. चांदवड येथील माजी सैनिकाची असल्याचे समोर आले असून, कारमध्ये आढळून आलेला सांगाडाही कार मालकाचाच असल्याचे बोलले जात आहे. दातांना लावलेल्या कॅपमुळे ही ओळख पटली असून घातपाताच्या संशयातून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेवाडी येथे पूर्णत: खाक झालेल्या अवस्थेत आढळलेली कार चांदवड तालुक्यातील नन्हावे येथील माजी सैनिक संदीप पुंजाराम गुंजाळ (वय ३७) यांची असल्याचे उघड झाले असून कारमध्ये मिळून आलेले हाडे (सांगाडा) देखील त्यांचीच असल्याचे बोलले जात आहे. लष्करातून काही महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले संदीप गुंजाळ हे समृद्धी महामागार्साठी सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत होते. घोटी येथील मुख्यालयात ते नेमणुकीस होते.
सोमवारी (दि.२९) सायंकाळी पत्नीसोबत त्यांचे शेवटचे संभाषण झाले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याचे कळते. गुंजाळ यांच्या दातांचे रूटकॅनल शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांच्या दातास कॅप बसविण्यात आली होती. दातांची ठेवण आणि लावलेली कॅप मुळे ही ओळख पटल्याचे सुत्रांनी सांगितले. मंगळवारी आंबेवाडी शिवारात जळलेल्या अवस्थेत सँट्रो कार मिळून आली होती. घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी व फॉरेन्सिक पथकाने तपासणी केली. यानंतर कारमधील हाडे पुरूषाचे असल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनासाठी हाडे जिल्हा रुग्णालयानंतर आणल्यानंतर त्याची ओळख पटवण्यात आली.
दरम्यान, बुधवारी (दि.३१) सकाळपासून या गुन्ह्याच्या तपासाने वेग धरला आहे. गुंजाळ यांच्या संबंधित आणि कार्यालयीन सहकाऱ्यांची चौकशी सुरू असून त्यांच्या घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. घटनास्थळी मोबाइलला रेंज नसल्याने तांत्रिक तपासात अडथळे येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ.वाजे हत्याकांडाची ही पुनरावृत्ती असल्याचे बोलले जात असून या घटनेमुळे गुंजाळ कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर नन्हावे गावात शोक व्यक्त केला जात आहे. विभागीय पोलिस अधिकारी अर्जून भोसले आणि सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या सूचनेनुसार संजय कवडे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
Igatpuri Car Fire Burn Dead Body Identify
Nashik Rural Police