इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झारखंडमधील सनदी अधिकारी आणि खाण विभागाच्या सचिव पुजा सिंघल यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. पुजा सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अटकेत आहेत. ईडीने पुजा यांचे चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमार यांची कसून चौकशी केली आहे. या चौकशीत कुमार यांनी अतिशय धक्कादायक माहिती ईडीला दिली आहे.
चार्टर्ड अकाऊंटंट कुमार याच्याकडे तब्बल १९ कोटी रुपयांची रोख रक्कम ईडीने जप्त केली आहे. यासंदर्भात कुमारने सांगितले की, मनरेगा पैशाच्या फसवणूक प्रकरणात ईडीने जप्त केलेल्या 17.49 कोटी रुपयांपैकी बहुतांश पैसे हे पूजा सिंघलचे होते. कुमारच्या घरातून मोठी रोकड जप्त केल्यानंतर ईडीने 6 मे रोजी कुमारला अटक केली होती. गुरुवारी रांचीमध्ये अधिकाऱ्यांसमोर त्याची चौकशी करण्यात आली.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीच्या ताब्यात असलेल्या सुमन कुमारने म्हटले आहे की, त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेली बहुतांश रोकड पूजा सिंघलची होती, जी त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी वसूल केली होती. पूजा सिंघलच्या सूचनेनुसारच, त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या पल्स हॉस्पिटलसाठी जमीन खरेदी करण्यासाठी एका नामांकित बिल्डरला तीन कोटी रुपये रोख दिले होते.
ईडीचा आरोप आहे की रुग्णालयाची जमीन आणि इमारतीची (पूजा सिंघलच्या मालकीच्या डायग्नोस्टिक सेंटरसह) किंमत 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि यंत्रसामग्रीची किंमत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून काळ्या पैशाचा गैरव्यवहार होत असल्याचे तपासात समोर आले आहे. पूजा सिंघल ही लाच म्हणून कोट्यवधी रुपये घेत होती, जी काळ्या पैशातून पांढर्या पैशात हस्तांतरित केली जात असल्याचाही ईडीला संशय आहे.
एका साक्षीदाराने ईडीला कबूल केले की, “आरोपी कनिष्ठ अभियंता राम बिनोद प्रसाद सिन्हा पूजा सिंघलला लाच देत होते. त्याने चार वेळा आरोपी कनिष्ठ अभियंत्याला 500 रुपयांच्या नोटांच्या 18 ते 20 बंडल बॅग आरोपींना देताना पाहिले असल्याची कबुली दिली आहे. त्याशिवाय ईडीला आणखी एका साक्षीदाराने सांगितले की, पूजा सिंघल उपायुक्तपदाचा कार्यभार सांभाळत असताना, तिला अनेक वेळा सीलबंद बॅगमध्ये रोख रक्कम वितरित करण्यात आली.
दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर झारखंड सरकारने पूजा सिंघलला निलंबित केले आहे. पूजा आणि तिचा पती अभिषेक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत.