मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयएएस अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम हे लवकरच राज्याच्या प्रशासनामध्ये परतणार आहेत. त्यांनी नुकतीच हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर) पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे ते राज्याच्या आरोग्य विभागात दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
डॉ. प्रवीण गेडाम यांनी सोशल मिडियात पोस्टद्वारे माहिती दिली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, स्वप्नपूर्ती. हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर) पदवी प्राप्त केली. वेळ छान गेला. जगभरात मित्र केलेत. लवकरच कामावर परत… महाराष्ट्र शासनात रुजू होण्यास उत्सुक… आनंदित.
डॉ. गेडाम हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. राज्यभरात गाजलेला जळगावचा घरकुल घोटाळा त्यांनी बाहेर काढला. याच प्रकरणी माजी आमदार सुरेश जैन आणि अन्य नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तसेच, डॉ. गेडाम यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदासह विविध शहरांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
त्यांच्या सर्वोत्तम कारभाराची दखल घेत मोदी सरकारने त्यांना केंद्रात बोलवून घेतले. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. तेथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या परदेशी शिक्षणाचा महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.
https://www.facebook.com/584214336/posts/pfbid02B9udUBWJjnC2o3vCTU2f3HpSgdEs6BbF5cWAzoQRg589ESt62iGJs7L23sJuQvSwl/?mibextid=Nif5oz
IAS Officer Dr Pravin Gedam Harvard Degree