विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पहिल्या लाटेनंतर विस्कटलेली आर्थिक घडी सावरेल अशी आशा असतानाच कोरोनाची दुसरी लाट येऊन आदळली. परिणामी पुन्हा लॉकडाउन लावण्याची वेळ आली. याचे दूरगामी परिणाम दिसून येत आहेत. अनेकांचे उद्योग, व्यवसाय बुडाले. अनेकांच्या नोकर्या गेल्या. बेरोजगारीचा दर पुन्हा वाढला. त्याचेच एक उदाहरण समोर आले आहे.
आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे मुंबईतील प्रसिद्ध हयात रेजन्सी या पंचतारांकित हॉटेलला तात्पुरत्या स्वरूपात आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. आर्थिक चणचण निर्माण झाल्यामुळे कारभार तास्पुरता स्थगित करण्याची घोषणा हॉटेलची मालकी असलेल्या कंपनीकडून करण्यात आली आहे.
हॉटेलमधील कर्मचार्यांचे पगार देण्यासाठी आणि हॉटेलचा खर्च भागविण्यासाठी मालक निधी उपलब्ध करून देत नसल्याचे सांगण्यात आले आहे, असे मुंबईतील हयात रेजन्सीचे महाव्यवस्थापक हरदीप मारवाह यांनी सांगितले. त्यामुळेच पुढील सूचना मिळेपर्यंत हॉटेल बंद करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हयात रेजन्सीचे मुख्यालय दिल्लीत असून, या हॉटेलची मालकी एशियन हॉटेल्स (नॉर्थ) या कंपनीकडे आहे. या कंपनीचे देशातील वेगवेगळ्या भागात हॉटेल्स आहेत. परंतु दिल्ली आणि मुंबईत हयात रेजन्सीची मुख्य हॉटेल्स आहेत. मुंबईतील सहारा विमानतळ मार्गावर असणारे हे हॉटेल सोमवार रात्रीपासून बंद करण्यात आले. मात्र दिल्लीतील हॉटेल सुरू राहणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना परिस्थितीमुळे लावलेला लॉकडाउन आणि त्यामुळे पर्यटकांची संख्या कमी झाल्यामुळे हॉटेलचे खर्च भागविणे मुश्किल झाले, असे कंपनीकडून सांगण्यात आले. कंपनीसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात मुंबईतील हॉटेल बंद करण्यात आले असून, यावर लवकरच तोडगा काढण्यासाठी मालकांशी बोलणे सुरू आहे, असे हयातचे उपाध्यक्ष आणि भारतातील प्रमुख सुजेय शर्मा यांनी म्हटले आहे.