पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील विविध शहरांमध्ये पेपरफुटीचे प्रकार सुरू असतानाच आता इयत्ता बारावीच्या परीक्षेत बायोलॉजीच्या पेपरमध्ये कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. या अंतर्गत एकूण २९ विद्यार्थ्यांवर कारवाई झाली असून यातील १९ विद्यार्थी पुणे विभागातील आहेत.
करोनानंतर यंदा पहिल्यांदाच राज्य शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षा पूर्ण क्षमतेने होताहेत. त्या अनुषंगाने परीक्षा पूर्वीप्रमाणेच कडक पद्धतीने होताहेत. या दरम्यान बुधवार, ८ मार्चला बारावीचा बायोलॉजीचा पेपर होता. या पेपरला कॉपी केल्याप्रकरणी २९ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच दहावीच्या हिंदी विषयाच्या पेपरमध्ये कॉपी करणाऱ्या ८ जणांना पकडण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.
यावर्षी बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्य शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. आधी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत उत्तर छापण्यात आले होते. तर बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. बुधवारीही बायोलॉजीच्या परीक्षेदरम्यान २९ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. यापूर्वी फिजिक्सच्या पेपरला ५० तर केमिस्ट्रीच्या पेपरला ४६विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात विद्यार्थ्याला कॉपी पुरविताना एका पालकाला पोलिसांनी पकडले होते. त्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथेही पालकांनी गोंधळ घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. कॉपी देण्यावरून परीक्षा केंद्रावर पालक-शिक्षकांमध्ये वाद झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर जिल्हा परिषद शाळेत मुलांना कॉपी देण्यासाठी आतमध्ये सोडत नसल्याने हा वाद झाला. तसेच इतर पालकांना सोडलं मग आम्हाला का नाही, असा सवाल पालकांनी यावेळी उपस्थित केला.
HSC Exam Student Copy Case Action Board