पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय लोकशाही पद्धतीत वेगवेगळ्या पातळीवर निवडणुका या होतच असतात, त्यासाठी भारतीय नागरिक मतदान करतात, मतदानाचा हक्क बजावणे हे त्यांचे कर्तव्यच ठरते. परंतु मतदान करण्यासाठी ओळखपत्र आवश्यक असते. या ओळखपत्रा शिवाय मतदान करता येत नाही, काही वेळा त्याकरिता नागरिकांना बरीच धावपळ करावी लागते. परंतु आता घरबसल्या मतदार ओळखपत्र उपलब्ध होऊ शकते.
विशेष म्हणजे या मतदार ओळखपत्राचा वापर केवळ मत देण्यासाठीच केला जात नाही. तर पत्ता पुरावा म्हणूनही तो एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आपले मतदार ओळखपत्र हरवले असेल तर आता काळजी करू नका. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, निवडणूक आयोगाने देशभरात डिजिटल व्होटर आयडी कार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक इलेक्टोरल फोटो आयडी कार्ड (e-EPIC) ची सुविधा सुरू केली होती. वास्तविक, e-EPIC ही मतदार ओळखपत्राची संपादन न करता येणारी आणि सुरक्षित PDF अशी एडीशन (आवृत्ती) आहे. ती तितकीच वैध आहे. आपण ते मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर सहज डाऊनलोड करू शकता. e-EPIC डिजी लॉकरमध्ये देखील अपलोड केले जाऊ शकते किंवा ते प्रिंट केले जाऊ शकते. हे डिजीटल मतदार ओळखपत्र घरबसल्या कसे मिळवायचे ते जाणून घेऊ या..
1: https://www.nvsp.in/ या वेबसाईटवर जा आणि ‘e-EPIC कार्ड डाऊनलोड करा’ यावर क्लिक करा.
2: नवीन कार्ड वापरकर्ता म्हणून लॉगिन/नोंदणी करा.
3: ‘e-EPIC डाउनलोड’ वर क्लिक करा.
4: EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक प्रविष्ट करा.
5: नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका.
6: डाउनलोड e-EPIC वर क्लिक करा.
8: आपला चेहरा पडताळणी पास करा.
9: KYC पूर्ण करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा
10: e-EPIC डाउनलोड करा.
सध्या EPIC डाऊनलोड सुविधा नोव्हेंबर 2020 नंतर नोंदणी केलेल्या मतदारांसाठी उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे NSVP रेकॉर्डमध्ये एक अद्वितीय मोबाइल क्रमांक आहे. इतरांसाठी ही सुविधा लवकरच उपलब्ध होईल.
e-EPIC म्हणजे काय?
इलेक्ट्रॉनिक इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड किंवा e-EPIC ही EPIC ची सुरक्षित पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF) आवृत्ती आहे. जी मोबाइल किंवा संगणकावर सेल्फ-प्रिंट करण्यायोग्य स्वरूपात डाउनलोड केली जाऊ शकते. मतदार त्यांच्या स्मार्टफोनमध्ये e-EPIC डाऊनलोड करू शकतात, तसेच डिजीलॉकरवर PDF म्हणून अपलोड करू शकतात किंवा ते मुद्रित करू शकतात आणि ते स्वयं-लॅमिनेट करू शकतात.
सर्वात मोठा फायदा
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक आयोगाने ई-ईपीआयसी सुविधा सुरू केली होती. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मतदारांना प्रत्येक वेळी शहर किंवा राज्य बदलताना नवीन कार्ड मागवण्याची गरज भासणार नाही. फक्त पत्ता बदलून ते कार्डची नवीन एडीशनला डाउनलोड करू शकतात.