कलात्मक हॉकी आता पहायला मिळत नाही
हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचे सुपुत्र माजी भारतीय हॉकी कर्णधार अशोक कुमार हे ऑलिंपिक दिन (जून २३) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने नाशिक येथे आले होते. यानिमित्ताने त्यांच्याशी झालेल्या संवादाचा सारांश असा…
सध्याच्या भारतीय हॉकी संघाची कामगिरी आणि भवितव्य याबाबत आपल्याला काय वाटते?
गेल्या सुमारे ४० वर्षांतील सर्वोत्तम संघ असे मी मनप्रीत सिंग (भारतीय कर्णधार) च्या सध्याच्या भारतीय हॉकी संघाचे वर्णन करेल. गेली ७-८ वर्षांपासून आपण उत्तम खेळत आहोत आणि आपले रॅंकिंग ही चांगले सुधारले आहे . सध्या आपण जगात ४ थ्या क्रमंकावर आहोत. आपल्याला टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्रॉंझ पदक मिळाले ते उगीच नाही . येत्या राष्ट्रकुल आणि २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्येही आपण पदकाचे दावेदार आहोत.
हा बदल किंवा ही सुधारणा कशामुळे झाली असावी असे आपल्याला वाटते?
याची अनेक कारणे आहेत. नंबर एक आपल्याकदे प्रथमच हर्मनप्रीतसिंग यांच्यासारखे उत्तम पेनल्टी कॉर्नर वर गोल करु शकणारे खेळाडू तयार झाले आहेत. जगातील सर्व अव्वल संघात (जर्मनी, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, स्पेन इ ) उत्तम पेनल्टी कॉर्नर मारणारे खेळाडू असल्याने ते नेहमी विजेते होतात . आपण येथेच कमी पडत होतो.
नंबर दोन, खेळाडूचा उत्तम फिटनेस आणि तो करून घेणारे जाणकार परदेशी प्रशिक्षक.
नंबर तीन , आपला संघ जगातील अनेक अव्वल लिग आणि इतर स्पर्धांमध्ये भाग घेउ लागल्याने खेळाडूना मोठ्या प्रमाणात exposure मिळते. जगातील मोठ्या आणि दर्जेदार खेळाडूबरोबर नियमित खेळायला मिळते. या सर्व गोष्टीचा फायदा आपल्याला मिळत आहे.
पेनल्टी कॉर्नरचा आपण उल्लेख केला, अलीकडे ज्या संघात तज्ज्ञ पेनल्टी कॉर्नर खेळाडू आहेत ते संघच विजेते होताना दिसत आहे, पेनल्टी कॉर्नर च्या अतिरेकाने कलात्मक हॉकी जी भारत आणि पाकिस्तान खेळत तिचे दिवस संपले आहेत असे वाटते का?
दुर्दैवाने हो. कलात्मक हॉकी आता पहायला मिळत नाही. आमच्या वेळी हॉकी खेळ मनगटाच्या कौशल्याने खेळला जात होता तो आता खांद्याने ( म्हणजे ताकद वापरून) खेळला जात आहे. पूर्वी मैदानात मध्यभागी चाली रचून , बेमालूम पासेस देउन , मैदानी गोल केले जात होते. आता फक्त गोल भोवती कोंडाळे करुन पेनल्टी कॉर्नर निर्माण करतात आणि पेनल्टी कॉर्नर घेणारा गोल करायला सज्ज होतो ! दुर्दैव…..
१९७०च्या दशकात भारत आणि पाकिस्तानचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी पाश्चात्य देशानी नैसर्गिक हिरवळीवरील हॉकी astro turf वर आणण्यासाठी भाग पाडले त्याचा परिणाम खेळावर काय झाला?
त्यामुळे कलात्मक हॉकी कायमची मेली , भारत पाकचे वर्चस्व कायमस्वरूपी संपलें. ॲस्ट्रो टर्फ वर मजबूत शरीरयष्टि असलेलेच खेळाडू म्हणजे युरोपियन आणि ऑस्ट्रेलियाचेच खेळाडू यशस्वी होताना दिसताहेत कारण कृत्रिम हिरवळीवर दमछाक होते आणि खूपच फिटनेस लागतो तो आपल्या येथील दमट हवामानामुळे भारतीय खेळाडूत नसतो. कृत्रिम हिरवळ आल्यावर लगेच भारताची सुवर्णपदक विजेतेपदाची मालिका कायमस्वरूपी खंडित झाली ती आजतागायत!
भारताने १९७५ साली क्वालालंपूर येथे विश्वचषक जिंकला त्यात अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला १-० हरविले आणि हा निर्णायक गोल तुम्ही केला. तुमच्या कारकीर्दित हाच सुवर्णक्षण म्हणता येइल का?
याचे उत्तर हो आणि नाही असे आहे , कसे ते सांगतो . हॉकी हा सांघिक खेळ आहे . मी जरी गोल केला तरी मला गोल करण्यासाठी चेंडू माझ्याकडे येण्यासाठी अनेकांनी मदत केली. मी फक्त Finishing केले . त्यामुळे १०० टक्के श्रेय मला नाही . तथापि त्या एकमेव गोलमुळे भारत विश्वविजेता झाला याचा आनंद आहेच.
आपले सुप्रसिद्ध वडील ध्यानचंद यांचा प्रभाव आपल्या खेळावर किती होता? त्यांनी तुमच्या खेळाचे कौतुक केले का?
त्यांच्यामुळेच मी हॉकी खेळायला लागलो पण त्यांच्या इतका मोठा होऊ शकलो नाही . त्यांनी भारताला तीन ऑलिंपिक सुवर्णपदके मिळवून दिली.( लॉस एंजेल्स १९३२, बर्लिन १९३६, लंडन १९४८ ), मला मात्र माझ्या १९६८ ते १९७६ या काळात एकही सुवर्णपदक भारताला मिळवून देता आले नाही ( १९६८ मेक्सिको रौप्य, १९७२ म्युनिक कांस्य आणि १९७६ मॉंत्रियल ७वे स्थान).
हॉकी कारकीर्दीतील दु:ख, असल्यास….
आमच्या वेळी संघाची आणि संघाच्या बरोबर असलेले कोच यांची निवड मेरिटवर न होता पदाधिकारी आणि त्यांच्या मर्जीतील लोकांचीच होत. त्यामुळे आमचे मैदानावरील आणि बाहेरील प्रश्न आम्हालाच सोडवावे लागत कारण संघाबरोबर असलेले अधिकारी शॉपिंग किंवा इतर उद्योग करीत फिरत. मी संघात सर्वोत्तम राईट इन पोझिशनला खेळणारा असूनही १९६८ च्या ऑलिंपिक साठी माझी निवड लेफ्ट इन पोझिशन साठी केली गेली आणि त्यामुळे झाले असे की माझा खेळ चांगला झाला नाही तसेच माझ्या जागी राईट इन वर घेतलेला खेळाडू (मी नाव सांगत नाही) वशिल्याचा असल्याने प्रभाव पाडू शकला नाही!!!
मला बलबिरसिंग आणि अत्ता -उर – रहमान यांच्यासारख्या महान खेळाडू बरोबर खेळायला मिळाले नाही हे माझे फार मोठे दु:ख आहे.
१९७३ साली ॲम्स्टरडॅम येथील विश्वचषक अंतिम सामन्यात हॉलंड विरूद्ध जगातील सर्वात जास्त वेळ चाललेला सामना (१३२ मि) भारत र्खेळला पण पेनल्टी स्ट्रोक घेण्यासाठी दोन भारतीय खेळाडूनी (no names please!) ऐनवेळी का कुणाला ठाऊक नकार दिला आणि पेनल्टी स्ट्रोक ची सवय नसलेल्या खेळाडूना स्ट्रोक मारावा लागला आणि भारत जिंकणारा सामना हरला हे फार मोठे दु:ख आहे!
Hockey Player and EX Indian Team Captian Ashok Kumar Interview Sports Deepak Odhekar