मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप किंवा काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीतील बैठकांसाठी जातात तेव्हा राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता असते. त्याचवेळी दिल्लीतील नेते महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत येणार आहे म्हटले की त्याचीही तेवढीच चर्चा होते. सध्या केंद्रीय गृहमंत्री अमत शहा यांच्या मुंबई दौऱ्याबाबत अशीच चर्चा सुरू आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी सायंकाळी मुंबईत दाखल होत आहेत. रविवारी आयोजित कार्यक्रमांमध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असले तरीही शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी होणाऱ्या बैठकांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. अमित शहा शनिवारी सायंकाळी साडेसातपर्यंत मुंबईत दाखल होतील. त्यानंतर ते थेट सह्याद्री या शासकीय निवासस्थानी जातील. तिथेच त्यांचा मुक्काम असणार आहे.
तत्पूर्वी रात्री उशिरा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसोबत त्यांच्या बैठका होणार असल्याचे कळते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींची या बैठकीला उपस्थिती राहील. बावनकुळे यांच्यासह सुकाणू समितीतील सदस्यांसोबत त्यांची स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही अमित शहा चर्चा करणार आहेत.
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, अलीकडच्या काळातील राजकीय घडामोडी, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आदी विषयांवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. यासोबतच सरकार चालविताना निर्माण होणारे प्रश्न, मंत्रीमंडळाचा विस्तार याबाबत शिंदे-फडणवीस यांच्यासोबत ते सविस्तर चर्चा करणार आहेत, असेही कळते.
पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क मैदानावर रविवारी सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी अमित शहा प्रमुख पाहुणे असतील. त्यानंतर ते आणखी काही बैठका भाजप नेत्यांशी करतील आणि त्यानंतर दुपारी अडिच वाजता गोव्याला रवाना होतील.
महत्त्वाचा दौरा
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. राजकीय निर्णयांसोबतच इतर पक्षांमधील घडामोडींबाबत यावेळी सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी लोकसभेत चाळीस जागा महाराष्ट्रात जिंकेल, असा दावा केला आहे.
HM Amit Shah Mumbai Tour Meetings Politics BJP