नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पती – पत्नी वेगळे झाल्यानंतर पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी पतीकडून खावटी दिली जाते. असेच एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. पण या प्रकरणातील लग्न केवळ ५० दिवसांचेच आहे. लग्न झाल्यानंतर केवळ ५० दिवसांमध्ये पतीला सोडून माहेरी निघून गेलेल्या पत्नीस मासिक सात हजार ५०० रुपये अंतरिम खावटी मंजूर करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.
या प्रकरणातील पत्नी नागपूर तर, पती पुणे येथील रहिवासी आहे. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी नागपूर कुटुंब न्यायालयाने पत्नीला मासिक १० हजार रुपये अंतरिम खावटी मंजूर केली होती. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता कुटुंब न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशात बदल केला व खावटीमध्ये समतोल साधून पत्नीस मासिक ७ हजार ५०० रुपये मंजूर केले.
हुंड्याचे कारण..
पती व सासरची मंडळी लग्न झाल्यापासूनच हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे या प्रकरणातील महिलेने सांगितले आहे. त्यामुळे तिला माहेरी जावे लागले. सध्या तिच्याकडे उत्पन्नाचा काहीच स्त्रोत नसल्याने ती पालकांच्या आधारावर जीवन जगत आहे. पती खासगी कंपनीत कार्यरत असून, त्याला वार्षिक १३ लाख ३२ हजार रुपये वेतन मिळते, तरीदेखील हुंड्यासाठी त्रास दिला जात असल्याचे पत्नीचे म्हणणे आहे.
पतीकडून आरोप अमान्य
पतीने पत्नीचे सर्व आरोप अमान्य केले आहेत. पती पालनपोषण करीत नाही, तसेच इतर सर्व आरोप खोटे असल्याचे पतीने म्हणले आहे. पती सध्या एका खासगी कंपनीत ३० हजार रुपये मासिक वेतनाने काम करीत आहे. पत्नी लघुचित्रपट, शिकवणी वर्ग, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व बँक एजन्ट म्हणून पैसे कमविते, असे न्यायालयाला त्याच्याकडून सांगण्यात आले.
High Court Order Wife Husband Compensation