इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – एखाद्या व्यक्तिच्या मृत्युनंतर त्याच्या कुटूंबियांना नुकसानभरपाई म्हणून मिळालेली रक्कम उत्पन्न मानून त्याच्यावर प्राप्तिकर कायद्यानुसार कर आकारला जाऊ शकतो का, अशी विचारणा गुजरात उच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागाला केली आहे. पॅन अमेरिकन वर्ल्ड कंपनीच्या विमान अपहरणात मृत्यु झालेल्या एका महिलेचया पतीने याविषयी याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्याच्या पत्नीच्या मृत्युप्रकरणात त्याला २० कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती.
१९८६च्या विमान अपहरण प्रकरणात पत्नीच्या मृत्यूसाठी मिळालेल्या २० कोटी रुपयांच्या भरपाईवर कर भरण्यासाठी प्राप्तिकर विभागाने गुजरातच्या कल्पेश दलाल यांना नोटीस पाठवली होती. १४ मार्च रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत खंडपीठाने आयकर विभागाकडून या प्रश्नांची उत्तरे मागवली आहेत. याचिकाकर्त्याला न्यूयॉर्क कोर्टाने २०१४ – १५ मध्ये भरपाई दिली होती. याचिकाकर्त्याची पत्नी तृप्ती हिचा १९८६मध्ये पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेजच्या फ्लाइटच्या अपहरणात मृत्यू झाला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ५० जणांमध्ये तिचा समावेश होता. न्यूयॉर्क कोर्टाने कल्पेश दलालला २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये २० कोटी रुपयांची भरपाई दिली होती. कल्पेशने मात्र ही रक्कम त्याच्या २०१४ – १५ च्या टॅक्स रिटर्नमध्ये उत्पन्न म्हणून दाखवली नाही.
२०१४ मध्ये आयकर विभागाने कल्पेशला बोलावून या उत्पन्नाबाबत विचारणा केली होती. उत्तरात कल्पेशने सांगितले की, अमेरिकेतील कायदेशीर लढाईच्या निर्णयात भरपाई म्हणून हे पैसे मिळाले. प्राप्तिकर विभागाने गेल्या वर्षी हे प्रकरण पुन्हा उघडले आणि कल्पेशला नोटीस बजावून २० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईवर आयकर भरण्यास सांगितले. त्यानंतर कल्पेशने उच्च न्यायालयात धाव घेतली. तृप्ती दलाल ५ सप्टेंबर १९८६ रोजी तिच्या ११ वर्षाच्या मुलासह आणि २१ सदस्यांच्या नृत्य मंडळासह न्यूयॉर्कला पॅन अमेरिकन फ्लाइटने प्रवास करत होत्या. मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानात एकूण ३६० प्रवासी होते. चार पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील कराची येथून या विमानाचे अपहरण केले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या ५० जणांमध्ये तृप्तीसह १३ भारतीय आणि दोन अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे.