इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘दुभत्या गायीच्या लाथा गोड’ , अशी एक मराठीत म्हण आहे. म्हणजे गाय दूध देणारी असेल तर त्याच्या लाथा सुद्धा खाव्या लागतात. परंतु नोकरी करणाऱ्या किंवा पैसे कमावण्या स्त्रियांच्या बाबतीत देखील काही वेळा अशी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होते की, तिला एखाद्या दूध देणाऱ्या गाई सारखे वागविले जाते, परंतु गाय जशी लाथ मारते याउलट पती आपल्या पत्नीलाच मारहाण करतो. परंतु न्यायालयाने अशा प्रकारे अन्याय करणाऱ्या पतीला चांगलेच फटकारले आहे.
पत्नीशी भावनिक संबंध न ठेवता पतीला नियमित पैसे मिळवण्याचे साधन म्हणजे ‘दुधाची गाय’ मानणे हे पत्नीवर क्रूरता आहे. अशी बायको हवी असेल तर तिने घटस्फोट घ्यावा. एका प्रकरणात एका महिलेची घटस्फोटाची याचिका स्वीकारताना कर्नाटक उच्च न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली.
महिलेने सांगितले की, तिला घटस्फोट हवा आहे, परंतु कौटुंबिक न्यायालयाने 2020 मध्ये तिचा अर्ज फेटाळला होता. तिच्या पतीने लग्नापासून आतापर्यंत तिच्याकडून 60 लाख रुपये या ना त्या कारणाने घेतले आहेत. बँकेने व इतर कागदपत्रांवरून महिलेने हे सिद्ध केले. त्यामुळे त्या महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या संदर्भात सुनावणीनंतर न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती जे.एम. खाजी यांच्या खंडपीठाने सांगितले की, पतीने आपल्या पत्नीला पैसे कमावणाऱ्या गायीसारखे वागवले. भावनिक संबंध नसून केवळ पैसे मिळवण्यासाठी त्यांनी पत्नीशी संबंध ठेवले. पत्नीला मानसिक आणि भावनिक वेदना देणारी पतीची ही कृती एक प्रकारे क्रूरता आहे.
या जोडप्याने 1999 मध्ये चिकमंगळूरमध्ये लग्न केले व 2001 मध्ये पालक बनले. पतीची आर्थिक परिस्थिती बिकट होती, डोक्यावर कर्जही होते, त्यामुळे कुटुंबात भांडणे होत होती. त्यामुळे पत्नीने यूएईला जाऊन नोकरी लावून कर्ज काढले. तेथून ती परत आली आणि त्या पैशातून नवऱ्याला शेतजमीन घेऊन दिली. पण तो शेतीत यशस्वी झाला नाही तर, 2012 मध्ये, यूएईमध्ये सलून उघडले. मात्र 2013 मध्ये पती भारतात परतला आणि पत्नीकडे नियमित पैसे मागत राहिला.
2017 मध्ये पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. कौटुंबिक न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला आणि सांगितले की, पतीची क्रूरता सिद्ध होत नाही. मात्र हायकोर्टाने पत्नीला प्रकरणी दिलासा देताना यापुढे पतीने पत्नीला त्रास देऊ नये आणि तिची रक्कम परत करावी असा आदेश दिला आहे.
High Court Decision Wife Treatment Milk Cow Legal Husband Family Relation