मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला आज मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडून विविध याचिकांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात निकाल लागत आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने आज महाविकास आघाडी सरकारला दिलासा देणारा निकाल दिला आहे.
महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती नको, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आगामी मनपा निवडणुकांमध्ये २ सदस्यांचा प्रभाग असेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याऐवजी एका प्रभागात एकच उमेदवार असावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. ही प्रभाग रचना मनमानी पद्धतीची असल्याचेही या जनहित याचिकेत म्हटले होते. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने आता त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीच राहणार आहे. हीच पद्धती आगामी निवडणुकीत राहण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.
येथे होणार निवडणुका
राज्यात नजिकच्या काळात मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.