नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र -2022 परीक्षा दि. 19 मे 2022 पासून सुरु होणार आहेत. या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार असून पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाचा आहे.
याबाबत परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या उन्हाळी 2022 परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात आले आहे. राज्यातील विविध परीक्षाकेंद्रांवर उन्हाळी सत्र-2022 परीक्षेसाठी एकूण 2200 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. दुसरा टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम वगळता उर्वरित सर्व पदव्युत्तर आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष, कृत्रिम अवयव विज्ञान, परिचर्या व सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या सर्व वर्षांच्या लेखी परीक्षा या दि. 01 जुलै 2022 पासून सुरु होणार असून दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी समाप्त होणार आहेत. सदर परीक्षेसाठी एकूण 45,000 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.
विद्यापीठाच्या हिवाळी सत्र – 2021 परीक्षेचे निकाळ 14 दिवसांच्या आत विद्यापीठाकडून जाहिर करण्यात आले आहेत. सद्य स्थितीत सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखांचे पदवीच्या 74661 विद्यार्थ्यांचे सर्व वर्षांच्या हिवाळी 2021 परीक्षांच्या प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षांचे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन सुरु आहे. सदर परीक्षांचे निकाल मे-2022 अखेरीस जाहिर करण्याचे प्रस्तावित आहे.
विद्यापीठाच्या मा. कुलगुरु महोदया व मा. कुलसचिव यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे कामकाज सुरु आहे. सदर परीक्षा यशस्वी होण्यासाठी परीक्षा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी अविरत प्रयत्नशील आहेत. विद्यापीठाच्या परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.