ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मानवी शरीरातील प्रत्येक अवयवाचे महत्त्वाचे स्थान आहे, यात अंतर्गत अवयवयामध्ये हाडांचे खूप महत्त्वाचे स्थान मानले जाते. शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली, तर हाडे ठिसूळ होऊ शकतात. त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. आजकाल नागरिक त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत.
आता सर्व जण निरोगी राहण्यावर विश्वास ठेवतात. परंतु अनेक छोट्या छोट्या सवयी आहेत, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. हाडे कमकुवत करणारी ही स्थिती आहे. स्त्रिया या आजाराला अधिक बळी पडतात कारण त्यांच्या शरीरात पुरुषांपेक्षा कमी हाडे असतात.
आपला आळस हाडे कमकुवत बनवण्यास खूप कारणीभुत होऊ शकतो. अनेकांची शारीरिक हालचाल फारच कमी असते, त्यामुळे हाडे नाजूक होतात.
सिगारेटमुळे होणाऱ्या हानीबद्दल सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे फुफ्फुसांना हानी होण्यासोबतच हाडे देखील कमकुवत होतात. धूम्रपानामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढू शकतो असे अनेक अभ्यासक सुचवतात.
अल्कोहोल आणि सोडा पिल्याने हाडे कमकुवत होऊ शकतात. जास्त अल्कोहोल हाडांसाठी आवश्यक हार्मोन्सच्या उत्पादनावर परिणाम करते. कार्बोनेटेड पेये प्यायल्याने हाडांची घनताही कमी होते.
काही जण एकाच वेळी अनेक किलो वजन कमी करतात, अशा परिस्थितीत ते हानिकारक ठरू शकते. अभ्यासानुसार, 18.5 पेक्षा कमी बॉडी मास इंडेक्स ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढवू शकतो.
झोपेचा तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. स्लीप अॅपनियामुळे हाडांची समस्या उद्भवू शकते, असे अनेक अहवाल सांगतात.
व्यस्त जीवनात, उन्हात बसण्यासाठी वेळ काढणे अनेकांसाठी कठीण आहे. परंतु हे जाणून घ्या की सूर्यप्रकाश आपल्या हाडांसाठी आवश्यक आहे कारण ते तुम्हाला व्हिटॅमिन डी वाढवते. व्हिटॅमिन डीमुळे आपली हाडे मजबूत होतात.
हाडे मजबूत करण्यासाठी, आपण चालणे, जॉगिंग आणि चढणे यासारख्या शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
कॅल्शियम समृद्ध पदार्थ खा, जसे की दुग्धजन्य पदार्थ, बदाम, ब्रोकोली, काळे द्राक्ष, सोया, निरोगी हाडांसाठी टोफू देखील समाविष्ट करू शकतात.