पुणे – पांढरे केस शक्यतो कुणालाही आवडत नाही, आपले केस काळे आणि सुंदर असावेत, यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. त्याकरिता सध्या बाजारात विविध प्रकारचे डाय उपलब्ध आहेत. परंतु अनेक जण केसांना मेहंदी लावतात. मेहंदी केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर मानली जाते. सध्या अनेक लोक केसांचा रंग तथा डाय वापरण्याऐवजी मेहंदी पावडर वापरतात. यामुळे केसांना चांगला रंग आणि चमक येते, पण मेहंदी जास्त काळ डोक्यावर ठेवली तर नुकसान होऊ शकते. केसांवर मेहंदी ठेवणे किती काळ सुरक्षित आहे हे जाणून घेऊ या…
इतके तास मेहंदी लावा
अनेक लोक केसांना मेहंदी ४ ते ५ तास ठेवतात. तसेच काही जण मेहंदी रात्रभर लावून ठेवतात. असे केल्याने केसांचा मुलायमपणा खराब होतो आणि केस कोरडे होतात. केसांना रंग येण्यासाठी मेहंदी लावली असेल, तर एक ते दीड तासापेक्षा जास्त काळ लावू नका. तसेच केसांवर कंडीशनिंगसाठी मेहंदी लावली असेल तर ४५ मिनिटांत काढून टाका.
मेहंदी नंतर तेल लावा
मेहंदीमुळे काही वेळा केस राट किंवा कठोर बनवू शकते. त्यामुळे मेंदी विरघळताना त्यात ऑलिव्ह ऑईल किंवा कोणतेही अन्य तेल टाका. कंडीशनर म्हणून मेंदी लावत असाल तर त्यात दही घाला, त्यामुळे केस चमकदार होतील. त्याचबरोबर केस पूर्णपणे शॅम्पू केल्यानंतर केस सुकवा. केस किंचित ओले झाल्यावर त्यावर तेल किंवा सीरम लावा.
नैसर्गिक मेहंदी लावा
सध्याच्या काळात अनेक केस तज्ज्ञ केसांना रंग देण्यासाठी मेहंदी वापरण्यास मनाई करतात. कारण आजकाल, मेहंदीमध्ये रासायनिक रंग देखील आढळतात. त्यामुळे मेहदी लावायची असेल तर केमिकलशिवाय नैसर्गिक मेहंदीची पावडर वापरा.