पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – आपले डोक्यावरचे केस ही प्रत्येकालाच अभिमान किंवा शान वाटणारी बाब असते. विशेषतः तरुण तरुणींना आपले केस मुलायम काळे आणि घनदाट असावेत, असे वाटते. परंतु सध्याच्या काळात केवळ ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर तरूणांचे देखील केस पांढरे होणे व केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. इतकेच नव्हे तर महिलांची केस देखील मोठ्या प्रमाणावर गळतात. या समस्यांनी अनेक जण त्रस्त असून त्यावर नेमका काय उपाय करावा ? याची प्रत्येकालाच चिंता असते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, प्रदूषण, शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता आणि चांगली झोप न लागणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर अंगणातील तुळशीच्या रोपाची मदत घ्या.
तुळशीचे नाव वाचून काही जणांना आश्चर्य वाटेल, परंतु तुळशीच्या रोपामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत की, जे केस गळणे, कोंडा, कोरडेपणा आणि पांढरे केस अशा अनेक समस्या दूर करण्यात मदत करतात. एवढेच नाही तर तुळशीचा पानांचा लेप लावल्याने रक्ताभिसरणही सुरळीत राहते. केसांशी संबंधित वेगवेगळ्या समस्यांसाठी तुळशीचा लेप कसा वापरावा. चला जाणून घेऊ या..
जाड आणि मऊ केसांसाठी तुळशीची पाने केसांसाठीच्या खोबरेल तेलात मिसळून तुटलेले केस पुन्हा दाट करण्यासाठी वापरू शकता. यासाठी केसांच्या तेलात तुळशीची पाने फोडून तासभर राहू द्यावे, यानंतर या तेलाने तुमच्या टाळूची हलक्या हातांनी मालिश करावे, 30 मिनिटांच्या मसाजनंतर केस धुवावे, या तुळशीच्या तेलाचा वापर केल्याने केस तुटणे कमी होते आणि केस दाट होतात.
लहान वयात केस पांढरे होणे हे व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे होते. पांढऱ्या केसांपासून सुटका करण्यासाठी तुळशी आणि आवळ्याचा वापर करावा, हा हेअर मास्क किंवा लेप बनवण्यासाठी आवळा पावडर आणि तुळशी पावडर कोमट पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. यानंतर आठवड्यातून दोनदा ही पेस्ट केसांना लावावी. या मास्कमुळे केस पांढरे होण्याची समस्या कमी होईल.
डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांसह कढीपत्ता वापरून हेअर मास्क बनवू शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी १० कढीपत्ता आणि १० तुळशीची पाने घेऊन पेस्ट बनवावी, या पेस्टमध्ये पेपरमिंट आवश्यक तेलाचे २ थेंब घालावेत. त्यामध्ये दहीही वापरू शकता. हा हेअर मास्क लावल्यानंतर २० मिनिटांनी केस धुवावेत. हा लेप केसांना लावल्याने कोंड्याची समस्या कमी होते.