इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यावरील कलाकार बोहल्यावर चढणाऱ्यांची संख्या वाढती आहे. अनेक कलाकारांनी गेल्या काही महिन्यात लग्नगाठ बांधली. छोट्या पडद्यावरील ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात हिचाही नुकताच विवाह झाला. आता त्यानंतर हास्यजत्रेतीलच आणखी एका अभिनेत्याचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्याने नुकतेच यावर स्पष्टीकरण दिले आहे.
काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या फेम’ स्नेहल शिदम हिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बने याच्याबरोबर एक रोमँटिक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. या दोघांचाही हा फोटो खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर निखिल बनेने या फोटोंबद्दल प्रतिक्रिया दिली. स्नेहलने मात्र मौन पाळले होते. आता स्नेहल शिदमने पहिल्यांदाच त्या फोटोबद्दल मौन सोडलं आहे.
नुकत्याच झालेल्या वनिता खरातच्या लग्नात स्नेहल शिदम आणि निखिल बने यांनी हजेरी लावली होती. लग्नसोहळ्यातील एक फोटो त्यांनी शेअर केला. या फोटोत ते दोघेही हातात हात घेऊन उभे आहेत आणि स्नेहल लाजताना दिसते आहे. या फोटोला तिने “पिरतीच्या फडात गं…धरला हात असा…काळीज येंधलं आरल …” असं कॅप्शन दिलं होतं. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे स्नेहल आणि निखिल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या, पण असं काहीच नसल्याचं स्पष्टीकरण निखिलने दिलं. त्यानंतर आता स्नेहलनेही या फोटोबद्दल भाष्य केलं आहे.
स्नेहल म्हणते, लोकांच्या विशेषतः सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय घडते आहे, हे जाणून घेण्याची लोकांना फार क्रेझ असते. आतापर्यंत अनुष्का शर्मा काय करते, काय घालते, कशी राहते याबद्दल लोकांची क्रेझ मी पाहिली होती. पण, आमचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तीच क्रेझ आमच्याबद्दल आहे हे बघून मला फारच भारी वाटलं. खरं तर मी आणि निखिल खूप सॉर्टेड आहोत, आमचं अफेयर नाही आणि चांगले मित्र आहोत,” असं स्नेहलने सांगितलं.
फोटो व्हायरल झाल्यावर त्याच्या बातम्या झाल्या. दोन-तीन दिवस आम्हाला खूप लोक फोन करत होते, आम्हाला सांगितलं का नाही, असं विचारत होते. पण नंतर निखिलची प्रतिक्रिया आणि त्याने सर्व गोष्टी स्पष्ट केल्या, आणि सगळं थांबलं,” असं स्नेहल हसत म्हणाली.
hasyajatra fame nikhil bane and snehal kadam romantic photo viral