इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एवढंच काय, पण या चित्रपटामुळे राजकारणही ढवळून निघालं आहे. सिनेमॅटिक लिबर्टी ही इतिहासाला पर्याय कशी ठरू शकते असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून अनेक वाद समोर येत आहेत. आता तर दस्तुरखुद्द बाजीप्रभू देशपांडेच्या वंशजांनीच पत्रकार परिषद घेत या चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. ‘हर हर महादेव’ चित्रपटावर त्यांनी पाच आक्षेप नोंदवले आहेत. यावेळी रतन देशपांडे यांच्यासह अमर वामनराव देशपांडे, किरण अमर देशपांडे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. असं असताना चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख सातत्याने अरे – तुरेच्या भाषेत दाखवला. हे अतिशय खटकणारं असल्याचे रतन देशपांडे यांचे म्हणणे आहे. हे चुकीचंही आहे. हिरडस मावळ येथे समुद्र दाखवला आहे. प्रत्यक्षात येथे कुठेही समुद्र नाही. तिथे नदी आहे. चित्रपटात शिरवळ तेथून महाराष्ट्रातील स्त्रिया, मुलींना इंग्रज बोटीतून घेऊन जाताना दाखवलं आहे. मात्र, त्याकाळी मावळमध्ये इंग्रजांचं खरंच इतकं प्राबल्य होतं का? हा मोठा प्रश्न असून आम्ही अनेक इतिहासकारांशी चर्चा केली. त्यांच्यानुसार, शिवाजी महाराजांनी त्यावेळी इंग्रजांना थोपवून धरलं होतं.
चित्रपटात इंग्रज सहजपणे स्त्रियांना घेऊन जाताना दाखवलं आहे. तर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे या सख्ख्या भावांमध्ये ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली भांडण दाखवलं आहे. लहानपणाचं भांडण दाखवून त्याला विश्वासघात असं नाव दिलंय. तसेच फुलाजीप्रभूंनी त्यांचा लहान भाऊ बाजीप्रभू देशपांडेंचा विश्वासघात केल्याचं दाखवलं आहे. यामुळे फुलाजीप्रभू देशपांडे यांची प्रतिमा डागाळली आहे. विशालगडावर या दोन वीरबंधूंची समाधी शेजारी शेजारी आहे. ते दोघेही स्वराज्यासाठी, महाराजांसाठी धारातीर्थी पडले होते. या दोघा भावांमध्ये २०-३० वर्षे वैर होतं आणि ते अचानक एकत्र आले असं होऊ शकत नाही.
सिनेमॅटिक लिबर्टी काल्पनिक चित्रपटात वापरता येते. मात्र, ऐतिहासिक घटना बदलण्याचा कोणालाच नाही म्हणत या घटनांचा रतन देशपांडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे त्याक्षणी तेथे उपस्थित नव्हते. मात्र, चित्रपटात बाजीप्रभू तंबूच्या बाहेर हजर असल्याचं दाखवलं आहे. शिवा काशिद ही अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा होती, मात्र चित्रपटात त्या व्यक्तिरेखेला थोडक्यात संपवण्यात आलं आहे. ज्यांनी जो पराक्रम केला तो नाकारणारे तुम्ही – आम्ही कोण? असा प्रश्न देखील रतन देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. चित्रपटात अफजल खानाला आणण्यासाठी बाजीप्रभूंनी गवंडी घेऊन खोट्या पद्धतीची मंदिरं बांधली असं दाखवण्यात आलं आहे. अशी मंदिरं बांधणं इतकं सोपं आहे का? देऊळ हे आपलं श्रद्धास्थान आहे. आपण गवंडी घेऊन खोटी मंदिरं बांधू का? असा सवाल देखील देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, ऐतिहासिक चित्रपट बनवताना इतिहास सल्लागारांची आवश्यकता असते. हा चित्रपट आधी इतिहासकारांना दाखवला होता का? असाही प्रश्न आहे. मात्र प्रत्यक्षात मी फेसबुकवर चित्रपटातील कलाकारांना चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आम्हाला दाखवा असं सांगितलं होतं पण विचारणा करूनही वंशज म्हणून आम्हाला आधी हा चित्रपट दाखवला नसल्याची खंत रतन देशपांडे यांनी व्यक्त केली.
Har Har Mahadev Movie Objection Bajiprabhu Deshpande