मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०२० मध्ये भारतात कोरोनाने एन्ट्री केल्यापासून सर्वसामान्यांना स्वस्थ बसताच आलेले नाहीत. सातत्याने कुठला ना कुठला व्हेरियंट डोकेदुखी ठरतोय. आता तर एच३एन२ मुळे राज्यात दोन लोकांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अॅलर्ट मोडवर गेलेली आहे.
अहमदनगर आणि नागपूर अशा दोन ठिकाणांवर एन्फ्ल्यूएंझा ए सब टाईप एच३एन२ च्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अर्थात राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याच विषाणूमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल अद्याप आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात एच३एन२चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.
देशभरातील रुग्णांमध्ये या विषाणूची लागण झालेल्या हजारो रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये विषाणूच्या पॅटर्नमध्ये अनपेक्षित बदल झाल्याची माहितीही तज्ज्ञांनी दिलेली आहे. या विषाणूने श्वसन मार्गाचे अनेक संसर्ग निर्माण केले आहेत. हा विषाणू फुफ्फुसाच्या आजाराच्या संसर्गांसाठी कारमीभूत ठरत आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ताप अंगावर काढू नका
या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वसामान्यांनी ताप अंगावर काढू नये, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने औषध घेणेच योग्य ठरेल. कारण हा नवा विषाणू सुद्धा तापाच्या मार्गेच हल्ला करीत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
त्या दोघांचा मृत्यू…
अहमदनगर येथील एक २३ वर्षीय तरुण अलिबागला फिरायला गेला होता. तेथून परत आल्यावर त्याला ताप आला. रुग्णालयात भरती केल्यानंतर काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. नागपूर येथेही एका वृद्धाचा मृत्यू झाला. या दोघांचाही मृत्यू कोव्हिड १९- एच३एन२ मुळे झालेला असल्याचे कळते. मात्र सरकारने अद्याप त्यावर शिक्कामोर्तब केलेल नाही.
राज्यात अॅलर्ट
राज्यात आरोग्य विभागात सर्व स्तरांवर अॅलर्ट घोषित करण्यात आलेले आहे. या विषाणूच्या संसर्गावर आवश्यक असलेले ओषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याचा सल्ला आम्ही दिलेला आहे. संपूर्ण यंत्रणा अॅलर्टवर काम करीत आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.
H3N2 Fever Infection Health Minister Maharashtra Alert