शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज राहूरी व राहाता येथे जनतेच्या विविध शासकीय विभागांशी संबंधित समस्या जाणून घेतल्या. काही समस्यांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. तर काही तक्रारींचे शासकीय यंत्रणांनी १५ दिवसांत निवारण करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री श्री.विखे- पाटील यांनी विविध विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे -पाटील यांनीही जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या तक्रारींचे संबंधित विभागांनी तातडीने निराकरण करण्यासाठी पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी आज राहूरी व राहाता येथे जनता दरबार घेतला.
जनता दरबारात पालकमंत्र्यांकडे नागरिकांनी महसूल, कृषी, जिल्हा परिषद, पोलिस, नगरपालिका, महसूल आणि विद्युत विभागाशी संबंधित अशा तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींची त्वरीत दखल घेवून त्याचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
पालकमंत्र्यांनी जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अनुपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी दिले.
राहूरी येथे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व कृषी अवजारे यांचे वाटप करण्यात आले. राहाता येथे काही लाभार्थ्यांना पंतप्रधान ‘ई-श्रम कार्ड’चे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे आदींसह जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
Guardian Minister Janta Darbar So Many Complaints