नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चांदोरी येथील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी पालकमंत्री श्री. भुसे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याबाबत कृषी विभागाने खबरदारी घ्यावी. शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. निफाड तालुक्यातील चांदोरी येथील बाळासाहेब हिंगोले, गणपत हिंगोले यांच्या द्राक्ष बागांची व बाळासाहेब घोरपडे यांच्या गव्हाच्या शेतीची पाहणी केली.
Guardian Minister Bhuse Unseasonal Rainfall Crop Loss Nashik