नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – जिल्ह्यातील शासकीय विभागीय ग्रंथालयात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ९५ हजार ३१५ ग्रंथसंपदा उपलब्ध असून जिल्ह्यातील वाचनप्रेमी व विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार आहे. या सुविधेचा ग्रंथालयाचे सभासद होवून जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय विभागीय ग्रंथालयातील ग्रंथपाल कविता महाजन यांनी केले आहे.
यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, वाचनप्रेमी व विद्यार्थ्यांना सभासद होण्यासाठी महिन्याच्या १ ते 5 तारखेदरम्यान अर्ज विक्री करण्यात येणार असून अर्ज प्राप्त झाल्यानंतर १० ते १५ तारखेपर्यंत जमा करणे आवश्यक असणार आहे. सभासद होण्यासाठी ग्रंथालयाची दोन वर्षासाठीची वार्षिक वर्गणी १०० रूपये व अनामत रक्कम (डिपॉझीट) ५०० रूपये असणार आहे. तसेच विविध धर्मादाय संस्था, शाळा, कॉलेज व महाविद्यालयांना सहभाग घेता येणार असून सभासद होण्यासाठी दोन वर्षासाठीची वार्षिक वर्गणी ७५० रूपये व अनामत रक्कम (डिपॉझीट) २५०० रूपये असणार आहे.
या बाबतच्या अधिक माहितीसाठी शासकीय विभागीय ग्रंथालय, नाशिक रोड, नाशिक येथे प्रत्यक्ष किंवा 0253-2465682 या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे ग्रंथपाल कविता महाजन यांनी कळविले आहे.