प्रतिवर्ष दोन हजार तरुणांना मिळणार रोजगार : खा. गोडसे
नाशिक : जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण मिळावे आणि त्यातून त्यांना चांगला रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठीच्या खासदार हेंमत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (सिपेट) शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे केंद्र नाशिक येथे व्हावे, या प्रस्तावाला राज्य शासनाची मान्यता मिळाली असून या प्रकल्पासाठी गोवर्धन शिवारातील प्रस्तावित भूखंड निश्चित करण्यात आला आहे. राज्य शासनानी मान्यता दिल्याने आणि गोवर्धन शिवारातील जागा निश्चित झाल्याने सिपेट प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून प्रतिवर्ष दोन हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर बेरोजगार तरुण असून या बेरोजगार तरुणांना शिक्षण देवून प्रशिक्षीत करण्याची गरज असल्याची मागणी अंबड, सातपूर, गोंदे, मुसळगाव, माळेगाव आदी औद्योगिक वसाहतींमधील कंपनी तसेच उद्योजकांकडून खासदार गोडसे यांच्याकडे सतत होत होती. कंपनी प्रशासनाचे म्हणणे योग्य असल्याने खा. गोडसे यांनी सिपेटसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरु केले होते. खा. गोडसे यांनी दिल्लीतील सिपेट प्रशासन आणि राज्याचे उद्योग विभागाचे सेक्रेटरी बलदेवसिंह यांच्याकडे सिपेटसाठी सततचा पाठपुरावा केला होता. नाशिक जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी सिपेटची असलेली गरज खा. गोडसे यांनी शासनाच्या लक्षात आणून दिली होती. सिपेट प्रकल्पासाठी खा. गोडसे यांनी सातपूर जवळील गोवर्धन शिवार, नाशिक तालुक्यातील शिंदे आणि सैय्यद पिंप्री शिवारातील उपयुक्त शासकीय जागाही सुचविल्या होत्या.
खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने अखेर सिपेट उभारणीच्या प्रस्तावास आज राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासानाच्या उद्योग विभागाने सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेसाठी (सिपेट) सातपूर जवळील गोवर्धन शिवारातील शासकीय भूखंड निश्चित केला आहे. या विषयीचे पत्र राज्याच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे सहसचिव रविंद्र गुरव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले असून गोवर्धन शिवारातील सर्वे नं. ३३ मधील १२.३३ हेक्टर आर इतकी जागा सिपेटकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. सिपेट प्रशिक्षण आणि शिक्षण संस्था जिल्ह्यातील तरुणांसाठी एक वरदानच ठरणार आहे. उद्योग विभागाच्या या निर्णयामुळे प्रस्तावित सिपेटचे केंद्र सुरु झाल्यानंतर प्रतिवर्ष सुमारे दोन हजार तरुणांना व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणाची संधी मिळून त्यांना सहजपणे रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.