मुंबई – गुगल क्रोम भारतातच नव्हे, तर जगभरात सर्वाधिक वापरण्यात येणारे ब्राउझर आहे. तुम्ही जर गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूपच आवश्यक आहे. त्याचे कारण म्हणजे केंद्र सरकारच्या भारतीय कॉम्प्युटर आपत्कालीन प्रतिक्रिया पथक (सीईआरटी-इन) या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित संस्थेने गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी गंभीर इशारा दिला आहे.
सीईआरटी-इनने एका अहवालात सांगितले, की गुगल क्रोम ब्राउझर अनेक तांत्रिक बाबींमध्ये कमकुवत आढळले आहे. तसेच अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये असलेला बग ऑर्बिटरी कोड लीक करू शकतो. फोनमधील महत्त्वाची माहितीही हॅकर्सपर्यंत पोहोचवू शकतो.
गुगल क्रोममध्ये विविध कमकुवत बाजू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व वापरकर्त्यांनी गुगल क्रोम अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. हॅकर्स वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा फोन ऑपरेट करू शकतात. कॉम्प्युटरवर हेरगिरी करण्यासाठी मॅलवेअरसुद्धा सोडू शकतात.
ऑनलाइन धोक्यापासून संरक्षणासाठी काय करावे
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांसह गुगल क्रोमने वापरकर्त्यांना नवीन व्हर्जन अपडेट करण्याची सूचना केली आहे. गुगलने नुकतेच विंडोज, मॅक आणि लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी क्रोमला ९६.०.४६६४.९३ वर अपडेट केले आहे. हे अपडेट सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
गुगल क्रोमचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.
– सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझर उघडा.
– आपल्या ब्राउझिंग स्क्रिनच्या उजव्या बाजूच्या तीन बिंदूंमधून सेटिंगवर जा.
– त्यानंतर सेटिंगमध्ये अबाउट क्रोमवर क्लिक करा. एकदा का तुम्ही त्यावर क्लिक केले की तुमचे गुगल क्रोम ब्राउझर अपटेड सुरू होईल.
– गुगल क्रोमवर ब्राउझरला पुन्हा लाँच करा. काही काळ बंद झाल्यानंतर ते पुन्हा सुरू करा. तुमचे गुगल क्रोम अपडेट झाले असले.