इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गूगलचे सीईओ सुंदर पिचाई हे नेहमीच चर्चेत असतात. मुळात भारतीय वंशाचा एक माणूस तिथे एवढ्या मोठ्या पदावर असल्याचा आपण भारतीयांना कोण अभिमान. याच सुंदर पिचाई यांनी नुकतेच भारतातील आपले वडिलोपार्जित घर विकले. या व्यवहारामुळे ते चर्चेत आले आहेत.
चैन्नईतील जे घर पिचाई यांनी विकले आहे. त्याच घरात त्यांचा जन्म झाला, एवढेच नव्हे, तर या घरात त्यांनी २० वर्षे काढली आहेत. त्यामुळे या घराशी त्यांची खास नाळ जुळली आहे. त्यामुळेच हे घर विकायचे म्हणजे त्याचे वाईट वाटणे साहजिक आहे. पिचाई यांच्याकडून या घराची खरेदी सी मणिकंदन यांनी केली आहे. पिचाई यांचा जन्म चेन्नईतील. त्यांचे शिक्षणही तेथेच झाले.
आई – वडिलांचे डोळे पाणावले
हिंदू बिझनेस लाइनने दिलेल्या माहितीनुसार, तामिळ अभिनेते आणि दिग्दर्शक सी. मणिकंदन यांनी पिचाई यांच्या घराची खरेदी केली आहे. हे घर कितीला विकले गेले किंवा अन्य काही तपशील समोर आलेला नाही. मात्र, हा व्यवहार होताना पिचाई यांच्या आई – वडिलांचे डोळे मात्र पाणावले होते. आपल्या आयुष्यातील पाहिली प्रॉपर्टी विकताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
कुठे आहे घर?
सुंदर पिचाई यांचे घर हे चेन्नईतील रहिवासी वस्ती असलेल्या अशोक नगर येथे आहे. मणिकंदन घराच्या शोधात होते. पिचाई घर विकणार असल्याचे त्यांना कळले तेव्हा हे घर घेण्याचा निर्णय मणिकंदन यांनी घेतला. घर खरेदी केल्यानंतर मणिकंदन म्हणतात, सुंदर पिचाई ज्या घरात रहात होते, ते विकत घेणे ही गोष्ट माझ्या आयुष्यातील अभिमानास्पद घटना आहे. सुंदर पिचाई यांच्या आईने स्वत: फिल्टर कॉफी तयार केली. त्यांच्या वडिलांनी मला मीटिंगच्या आधी सर्व कागदपत्रे दिली. त्यांची विनम्रता पाहून मी भावूक झालो. मला कागदपत्रे सोपवण्याआधी सर्व कर भरले होते, असे मणिकंदन यांनी सांगितले.