नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण जगावर जणू राज्य करणाऱ्या गुगलला भारतात मोठा दणका मिळाला आहे. Android मधील प्रबळ स्थानाचा गैरवापर करण्याशी संबंधित एका प्रकरणात कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (CCI) दिलेला आदेश नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल (NCLAT) ने कायम ठेवला आहे. त्यामुळे आता गुगलला 1,337.76 कोटी रुपयांचा दंड भरावाच लागणार आहे. नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल (NCLAT) ने गुगलला दंड भरण्यासाठी आणि आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे.
भारतातील कंपन्यांमधील स्पर्धेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी एजन्सी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियावर (CCI) आहे. गुगलने बाजारावर प्रभाव टाकल्याचा आरोप करत CCIने दंड ठोठावला. गुगलने या निर्णयाला एनसीएलएटीसमोर आव्हान दिले. तसेच, आपल्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे गुगलने म्हटले होते.
NCLAT चे अध्यक्ष न्यायमूर्ती अशोक भूषण आणि सदस्य आलोक श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने गुगलला निर्देशांचे पालन करण्यास आणि दंडाची रक्कम तीस दिवसांच्या आत जमा करण्यास सांगितले. यासोबतच खंडपीठाने स्पर्धा आयोगाच्या आदेशातही काही सुधारणा केल्या आहेत. एनसीएलएटीनेही गुगलचे अपील फेटाळले आहे की स्पर्धा आयोगाने तपासात नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन केले आहे.
अँड्रॉईड मोबाईल उपकरणांच्या बाबतीत आपल्या वर्चस्वाचा फायदा घेऊन स्पर्धाविरोधी क्रियाकलापांमध्ये गुगल सहभागी असल्याचे गेल्या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी CCI ला आढळला होते. CCI ने गुगलला 1,337.6 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीसीआयने गुगलला अनुचित व्यापार पद्धतींमध्ये सहभागी होण्यापासून परावृत्त करण्याचे निर्देशही दिले होते. स्पर्धा आयोगाच्या याच निर्णयाला अपीलीय न्यायाधिकरणात आव्हान देण्यात आले होते. आता मात्र, एनसीएलएटीने अपिल फेटाळले आहे. परिणामी, गुगलला दंड भरावाच लागणार आहे.
Google Appeal Reject by NCLAT 1337 Crore Fine