पणजी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोव्यात पार्टीचे नियोजन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्याच्या पर्यटन विभागाने उघड्यावर अन्न शिजवणे, दारू पिणे यासारख्या कामांवर बंदी घातली आहे. एवढेच नाही तर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचेही सांगण्यात आले आहे. गोव्याची पर्यटन क्षमता ढासळण्यापासून वाचवण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
असे आहेत निर्बंध
जारी करण्यात आलेल्या आदेशात गोव्याच्या पर्यटन विभागाने मालवण (महाराष्ट्र) आणि कारवार (कर्नाटक) या राज्याच्या बाहेरील भागात जलक्रीडा स्पर्धेसाठी अनधिकृत तिकिटांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. संचालक निखिल देसाई यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ‘मोकळ्या ठिकाणी अन्न शिजविणे, कचरा पसरवणे, उघड्यावर दारू पिणे, बाटल्या फोडणे इत्यादी’ प्रतिबंधित कामांचा समावेश आहे.
ही होईल कारवाई
पर्यटकांच्या हालचालींमध्ये अडथळा आणणाऱ्या आणि वस्तू खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या अशा कामांवरही बंदी घालण्यात येणार आहे. अधिकृत ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या पर्यटन उपक्रमांसाठी तिकीट विक्रीवरही बंदी असेल. नियमांचे पालन न केल्यास ५००० रुपये दंड आकारला जाईल. जी ५० हजार रुपयांपर्यंत वाढवता येईल. तसेच आयपीसी कलम १८८ अंतर्गत कारवाई होऊ शकते.
विशेष बाब म्हणजे २०१९ मध्ये गोवा पर्यटन स्थळांमध्ये (संरक्षण आणि देखभाल) सुधारणा गोवा विधानसभेत मंजूर करण्यात आली होती. ज्यामध्ये दारू पिणे, उघड्यावर अन्न शिजवणे किंवा पर्यटन स्थळांवर बाटल्या फोडणे यावर बंदी होती. याशिवाय, शॅकसारख्या इतर ठिकाणी पर्यटकांना खाण्यापिण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार होते.
Goa Party Tourism New Rules Government