इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महादयी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून गोवा आणि कर्नाटकमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महादयीच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे.
महादयी नदीचा पाणी वाद मिटला असून नदीचे पाणी दक्षिणेकडील राज्याला देण्यात आल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. शहा यांच्या या वक्तव्यावर गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल संतापले आहेत. नदीचे पाणी आम्ही कधीही बाहेर वळवू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप सरकारचे मंत्री नीलेश काब्राल म्हणाले, महादयी नदीचे पाणी वळवण्यास आमच्या मुख्यमंत्र्यांनी संमती दिलेली नाही. मला माहीत आहे की ते (सावंत) हे कधीच करणार नाही. केंद्रीय गृहमंत्री काय बोलत होते माहीत नाही. खेऱ्यातील पाणी वापरण्यास आमचा विरोध नाही, पण ते बाहेरून वळवायला आम्ही कदापि परवानगी देणार नाही. ते पुढे म्हणाले की, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महादयी प्रश्नावर गोव्याला पाठिंबा न दिल्यास आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू शकतो.
गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी बेळगावात भाजपच्या जनसंकल्प यात्रेला संबोधित करताना म्हटले होते की, मला तुम्हाला सांगायचे आहे की, दोन राज्यांमधील दीर्घकाळ चाललेला वाद मिटवून भाजपने कर्नाटकला महादयीचे पाणी दिले आहे. याचा फायदा येथील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्याला झाला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा दाखला देत विरोधी पक्ष भाजपच्या गोवा धोरणावर सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसने या मुद्द्यावर सीएम सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) सावंत यांच्या ‘मौन’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि शहा यांच्या वक्तव्यावर भाजप आणि राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
Goa Karnataka River Controversy Amit Shah Statement