नागपूर – ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवेचे चित्र आजही चिंताजनक आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकत नाही. तो जर ‘व्हेंटिलेटर’ वर असेल तरच योजनेचा लाभ मिळू शकतो, ही मोठी विसंगती आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक बेलखोडे रविवार, दि. १२ रोजी येथे व्यक्त केली.
सी. मो. झाडे फाऊंडेशनचा उपक्रम असलेल्या श्री. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे देशात नांदेडच्या आदिवासी बहुल किनवट तालुक्यात गेल्या तीन दशकांपासून सेवा देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक बेलखोडे यांना ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
सकाळ’ चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन डॉ.बेलखोडे यांना गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष अॅड. शिवाजीराव मोघे होते ‘ राष्ट्र महाराष्ट्र’ न्यूज पोर्टलचे संपादक आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखडे (नवी दिल्ली) हे प्रमुख पाहुणे होते. तर सर्वोदयी विचारवंत अॅड. मा. म. गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सन्मानाला उत्तर देताना डॉ. बेलखोडे यांनी शासकीय सेवेत आलेले विपरीत अनुभव, यंत्रणेतील भ्रष्टाचार, सामान्य रुग्णांची चांगल्या सरकारी आरोग्य सेवेअभावी होणारी परवड आदींचा सविस्तर मागोवा घेत जीव वाचवणे हे डाॅक्टरांच्या हाती असते, तर रुग्णालयांमध्ये पेशंट मरण पावले नसते हे वास्तव असल्याचे नमूद केले.
अशोक वानखडे म्हणाले की, आजकाल वैद्यकीय व्यवसाय सर्वोच्च पैसे घेणारा बनला असून खासगी रुग्णालये कसाईखाने झाले आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आपण जिवंत घरी जाऊ की नाही याची खात्री रुग्णाला मुळीच नसते मात्र आपल्याला बिल प्रचंड येणार आहे याची खात्री असते. अशा स्थितीत डॉ. बेलखोडे यांचे कार्य दैवी आहे.
याप्रसंगी श्रीराम पवार, शिवाजीराव मोघे यांनीही विचार व्यक्त केले.
सी. मो. झाडे फाऊंडेशनचे विश्वस्त विकास झाडे यांनी प्रास्ताविक केले. भारती झाडे यांनी डॉ. बेलखोडे यांच्या जीवनकार्याचा धावता आढावा घेतला. वाडी, दाभा येथील सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रात झालेल्या या कार्यक्रमासाठी स्वत: गिरिश गांधी श्रोत्यांमध्ये होते. तसेच दिल्लीतील प्रसिद्ध लेखक लक्ष्मणराव शिरभाते यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत यावेळी उपस्थित होते.