नितीन नायगांवकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गिफ्ट हॅम्पर हा एक ट्रेंड आहे. एखादी स्पर्धा असेल, सण किंवा शुभप्रसंग असेल तर खूप मोठे गिफ्ट घेण्यापेक्षा स्वस्त आणि चांगले पॅकेजिंग असलेले गिफ्ट हॅम्पर देण्याची एक नवी संस्कृती रुजली आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक मोठ्या कंपन्या आपल्या विविध उत्पादनांना एकत्र आणत सर्वसामान्य माणसाला परवडेल असे गिफ्ट हॅम्पर उपलब्ध करून देत आहेत. हे दिसायला आकर्षक असतात आणि कुणाला भेट देतानाही छान वाटतात. पण आता कंपन्यांना गिफ्ट हॅम्पर तयार करताना काही नियमांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
ग्राहक संरक्षण मंत्रालयाने गिफ्ट हॅम्पर तयार करण्यासंदर्भात एक नियमावली तयार केली आहे. या नियमावलीमुळे सर्व कंपन्यांना गिफ्ट हॅम्पर पॅक करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. गिफ्ट हॅम्पर खरेदी करताना आपल्याल त्याच्या आत असलेल्या वस्तू बघता येत नाहीत. त्या वस्तू जुन्या आहेत की नवीन आहेत, हेही कळत नाही. पण जेव्हा ती वस्तू आपण कुणाला तरी भेट देतो तेव्हा त्या व्यक्तीला मात्र नक्कीच त्यातील उत्पादनांचे वास्तव कळत असते.
गेल्या काही दिवसांमध्ये गिफ्ट हॅम्परच्या आतील वस्तू एक्स्पायरी डेट गेलेल्या असल्याचे आढळून आले. त्यासंदर्भात तक्रारीही ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे आल्या. त्यामुळे कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. अश्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने १ फेब्रुवारीपासून नवीन नियमावली लागू करण्याची घोषणा केली आहे. या नियमावलीनुसार कंपन्यांनी जुन्या झालेल्या किंवा एक्स्पायरी डेट जवळ असलेल्या वस्तू गिफ्ट हॅम्परमध्ये दिल्या तर त्यांना १० लाख रुपयांचा दंड आणि २ वर्षांचा तुरुंगाव होणार आहे.
पॅकिंगच्या आवरणावर हे हवे
गिफ्ट हॅम्परच्या पॅकिंगच्या आवरणावर यापुढे आत असलेल्या सर्व उत्पादनांची माहिती केंद्र सरकारने अनिवार्य केली आहे. कंपनीचे नाव, पॅकिंग करणाऱ्यांचे नाव, आयात करणाऱ्याचे नाव, एक्स्पायरी डेट, वजन, वस्तूंची संख्या ही माहिती आवरणावर असणे आवश्यक असल्याचे नवीन नियम म्हणतो. फसवणुकीचा प्रकार टाळण्यासाठी सरकारने हा उपाय शोधून काढला आहे.
Gift Hamper New Rule from 1 February 2023 10 Lakh Fine