घोटी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मागील भांडणाची कुरापत काढून लग्न सोहळ्यासाठी टिटवाळा येथून आलेल्या युवकाचा मध्यरात्री सिन्नर फाटा येथे खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. अनिकेत शिंदे ( वय २९ ) हे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी हे फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, अनिकेत हा आपल्या घोटी स्टेशन परिसरातील नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी आला होता. लग्न सोहळा आटोपून पुन्हा टिटवाळा येथे जाण्याच्या तयारीत असतांना त्याचा बदलापूर येथील साडू संदिप शांताराम निकाळे यांच्यात वाद झाला. त्यानंतर संदिप निकाळे याने अनिकेत यास फोन लावून सिन्नर फाटा येथे बोलावून घेतले.
येथे सासरची बाजू का घेतो माझी बाजू का घेत नाही असा पुन्हा वाद घालून मयत हातातील लाकडी दांडे, लोखंडी रॉड व लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी संदिप निकाळे हा सराईत गुन्हेगार असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर करत आहेत.