गणेशोत्सव विशेष लेखमाला
नाशिक श्रीगणेश
रविवार कारंजावरचा चांदीचा गणपती
पुण्याच्या दगडुशेठ हलवाई गणपती प्रमाणेच नाशिकचा ‘कै. गंगाप्रसाद पन्नालाल हलवाई ट्रस्ट’ चा रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ’ नावाचा गणपती प्रसिद्ध आहे. हा गणपती चांदीचा गणपती याच नावाने ओळखला जातो. नाशिक शहराचा सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या रविवार कारंजावर हा गणपती आहे. विशेष म्हणजे १०४ वर्षांची दीर्घ परंपरा या गणपतीला लाभली आहे. या बाप्पांबद्दल आज आपण जाणून घेऊया..
लोकमान्य टिळकांनी १९१३साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.त्यानंतर चारच वर्षांनी १९१७ पासून नाशिकला रविवार कारंजा परिसरात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरूवात झाली. देशभक्तीचा प्रचार प्रसार करणार्या या मंडळावर इंग्रज सरकारची करडी नजर होती.त्यामुळे अनेक वेळा या मंडळाला ‘ बंदी’चा सामना करावा लागला. शेवटी १९२८ या वर्षा पासून कै. गंगाप्रसाद पन्नालाल हलवाई यांनी याच परिसरात असलेल्या आपल्या मिठाईच्या दुकानात गणपती स्थापन करण्यास सुरूवात केली ती आजतागायत चालू आहे.
चांदीचा गणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या रविवार कारंजावर १९७९ पर्यंत दरवर्षी गणेशोत्सवात शाडूच्या मातीचा गणपती बसवत असत.
१९७९-८० साली मंडळाच्या पदाधिकारी यांनी चांदीचा गणपती तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर्षी अगदी लहानसा चांदीचा गणपती तयार करून स्थापन केला. त्यानंतर देणगीदार मिळवून दरवर्षी या गणपतीत चांदीची भर टाकण्यात आली. २०००८-०९ यावर्षी २०१ किलो चांदीचा गणपती तयार करण्यात आला आणि त्याच वर्षी पाच दिवस विधिवत पुजा करून संत महात्म्यांच्या हस्ते या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
धार्मिक, अर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात हे गणपती देवस्थान कायम आघाडींवर असते. रविवार कारंजा गणपती मंडळाची दरवर्षी गणेशोत्सवात सजावट हा कायम औत्सुक्याचा विषय असतो. या मंडळाची सजावट पाहण्यासाठी जिल्ह्यांतील लोक गाड्या करून येतात. मंडळाने १९९१-९२ साली स्थापन केलेली सिद्धिविनायक नागरी पतसंस्था आणि २००१-०२ यावर्षी स्थापन केलेला सिद्धिविनायक धर्मार्थ दवाखाना हजारो लोकांना उपयुक्त ठरत आहे. रविवार कारंजा वरचा चांदीचा गणपती ही नाशिकची शान आहे.मान आहे. दुसर्या जिल्ह्यांतील पाहुण्यांना नाशिककर आवर्जून हा गणपती दाखवायला नेतात. या गणपती विषयी एवढी आपुलकी आणि आस्था प्रत्येक नाशिककराच्या मनांत आहे.
Ganeshotsav Special Article Ravivar Karanja Chandicha Ganapati by Vijay Golesar
Ganesh Festival Nashik