नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जी२०मध्ये भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. जगातील सर्वांत बलाढ्य मानले जाणारे देश भारताची शक्ती बघून अवाक् झाले. अशात काही महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा झाली. त्यात भारत, पश्चिम आशिया आणि युरोपातील देशांना जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरचीही चर्चा झाली. हा कॉरिडॉर या तीन प्रदेशांमध्ये व्यावसायिक देवाणघेवाण वाढविण्यासाठी विशेष उपयुक्त ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी या प्रकल्पात विशेष रस घेतला आणि त्याचा वारंवार उल्लेख केला. त्यामुळे हा प्रकल्प नेमका काय आहे, याबद्दल उत्सुकताही निर्माण झाली. या प्रकल्पाला ‘इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाला ‘स्पाईस रुट’ म्हटले जात आहे. तसेच चीनकडून राबवल्या जाणाऱ्या बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्हला (बीआरआय) पर्याय म्हणूनही या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पांतर्गत भारत आणि युरोपला जोडण्यासाठी पश्चिम आशियाई देशांतून रेल्वेजाळे निर्माण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची मोदी यांनी घोषणा केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील या प्रकल्पावर भाष्य केले.
यावेळी सौदी अरेबियाचे राजे आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलाम अल साऊद, युरोपीयन संघाचे अध्यक्ष उरसुला वोन डेर लेयेन आदी जागतिक नेत्यांनी प्रकल्पाचे स्वागत केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम आशिया आणि युरोपला रेल्वेमार्ग तसेच बंदरांच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये डिजिटल कनेक्टिव्हीटी प्रस्थापित करणे तसेच या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. ग्रीन हायड्रोजनसारख्या उर्जा निर्मितीसाठी कामाला येणाऱ्या अन्य बाबींचीही देवाणघेवाण या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अमेरिका आणि भारत करणार नेतृत्व
या प्रकल्पाचे नेतृत्व अमेरिका आणि भारत संयुक्तपणे करणार आहे, हे विशेष. या प्रकल्पांतर्गत भारत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, इस्रायल, युरोपीय संघातील देशांत दळणवळणासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. हा कॉरिडॉर जगाला शाश्वत विकासाचा मार्ग दाखवेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर हा कॉरिडॉर म्हणजे मोठी बाब असल्याचे जो बायडेन यांनी म्हटले आहे.
चीनला उत्तर
‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरडॉर’ या प्रकल्पाला एक मोठे उत्तर ठरण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेच आता कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरकडे बघितले जात आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्हला हे उत्तर असू शकते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे फार महत्त्व असेल. या प्रकल्पामुळे भारत-मध्य पूर्व एकमेकांना जोडले जातील. चीनच्या बीआरआयला हा पर्याय आणि उत्तर असेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
G20 Summit India Economic Corridor Europe Middle East