इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयपीएलचा मास्टरमाईंड व मनी लॉंड्रिंग प्रकरणातील आरोपी ललित मोदी याने ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना खुलेआम धमकी दिली आहे. वकिलांच्या गॉसिपींगमध्ये मला फरारी म्हणणं बंद करा, अशी आपली नम्र विनंती आहे, असं म्हणत यापुढे एवढ्या सौम्य शब्दांमध्ये बोलणार नाही, हेही लक्षात ठेवा, अशी धमकीच ललित मोदीने रोहतगी यांना दिली आहे.
ललित मोदी याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने मुकुल रोहतगी यांचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. ललित मोदी याच्यावर अरबो रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. प्रकरण पुढे आल्यापासून तो भारताबाहेरच आहे. रोहतगी यांच्यावर निशाणा साधताना त्याने म्हटले आहे की, ‘वकिलांना गॉसिपींग करण्याची सवय आहे हे मला माहिती आहे. पण या गॉसिपींगमध्ये मला फरारी म्हणणं बंद करा. म्हणायचेच आहे तर मला मिस्टर मोदी म्हणा. पुढच्यावेळी मी एवढ्या सौम्य भाषेत बोलणार नाही.’ ‘माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर आहे. पण मी तुमचा कधीच वापर केला नाही. ना माझ्याकडे तुमचा नंबर आहे. तुमच्याकडे मात्र माझ्याबद्दल केवळ तिरस्कार आहे. माझी नम्र विनंती आहे की, मला फरारी म्हणू नका. न्यायालयाने असे म्हटले असते तर मला काहीच हरकत नव्हती, पण तुम्ही या भानगडीत पडू नका, असे ललीत मोदी या पोस्टमध्ये म्हणतो आहे.
आयुष्य फार लहान आहे
आपलं आयुष्य फार लहान आहे. कुठेही धोका होऊ शकतो. अलीकडेच मला एका बसच्या अपघातातून वाचलो आहे. त्यामुळे काळजी घ्या, असा धमकीवजा इशारा ललीत मोदी याने रोहतगी यांना दिला आहे.
लाखवेळा विकत घेऊ शकतो
न्यायाधिशांना खरेदी करून रातोरात वकील मंडळी आपल्या क्लायंटला न्याय मिळवून देऊ शकतात. पण मी तुम्हाला लाखवेळा खरेदी करू शकतो आणि लाखवेळा विकू शकतो. तुम्ही माझ्यासाठी मुंगीप्रमाणे आहात. सुदैवाने मला मुंग्या खूप आवडतात म्हणून त्यांना चिरडून टाकत नाही, अशी थेट धमकी ललित मोदी याने दिली आहे.
https://www.instagram.com/p/CnVXNtlgvJK/?utm_source=ig_embed&ig_rid=1e48e218-2e86-4617-900e-203c5a9d0296
Fugitive Lalit Modi Open Threat to Mukul Rohatgi
Instagram Post Advocate